लोकसत्ता टीम वर्धा : भेंडी, शेंगा, वांगे, कोहळे अशा नियमित भाज्या खाऊन कंटाळा आलाय ? मग चला तर पौष्टिकतेने परिपूर्ण रानभाजी खायला. आर्वी परिसर हा जंगलाने वेढलेला. तसेच सर्वत्र माळरान पसरलेले. त्यात विविधतेने बाहरलेली झाडे. रानमेवा तर पावलोपावली. तसेच मंदसा नैसर्गिक दरवळ असलेल्या रान भाज्यांचा तर सुकाळच. या परिसरात मिळणाऱ्या रान भाज्याची सर्वत्र चर्चा होत असते. पावसास सुरवात होताच या भाज्या बहरू लागतात. त्यासाठी खवय्ये प्रतिक्षा करीत असतात. आर्वी तालुक्यातील ब्राम्हणवाडा, टाकरखेड, काकडधारा, सालफळ, किन्हाळा, उमरी, चोपण, दानापूर, पाचोड, ढगा, बोथली, चोरांबा ही गावे रान भाज्यांसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. आयुर्वेदिक जडी बुटीसाठी पण गावांची प्रसिद्धी आहे. परिसरात प्रामुख्याने आदिवासी लोकं निवास करुन आहेत. या भाज्यांची त्यांची चांगलीच ओळख. निसर्गाशी तद्रूप या आदिवासी बांधवांनी हा रानमेवा जोपासला आहे. जुलै महिन्यात या भाज्या निघायला सुरवात होते. या जंगली व डोंगराळ भागात अनेक जण राहतात. त्यांना कामं मिळत नाही. तेव्हा या भाज्या व जांभूळ आणि तत्सम जंगली फळे विकून ते चार पैसे कमवितात. पण प्रामुख्याने भाज्यांना शहरात चांगली मागणी असते. कटुले, वासन, तारोटा, आरा, दोडा, बाणा, गलांगा, काटा, चेरवाई, कटुलीच, करंज्या, पिठपापडा अश्या भाज्यांना मागणी असते. आणखी वाचा-जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्तदिन विशेष : ‘प्लास्टिक पिशवीची सवय सोडा, जीवनाशी नाते जोडा’; डॉक्टर दाम्पत्याची विशेष मोहीम ठराविक काळात त्या मिळतात. स्वाद व सुगंध वेगळा असल्याने शहरी भागात त्यास चांगली मागणी असते. म्हणून चढा दर पण मिळतो. केवळ तीन महिने उपलब्ध असणाऱ्या या भाज्या खाल्ल्यास चांगले पोषण होते. या मोसमी रान भाज्यांनी शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते.त्यातून भरपूर जीवनसत्वे मिळतात. कोणत्याही खत किंवा किटनाशकाचा वापर झालेला नसतो. अत्यंत नैसर्गिक वातावरणात फुललेल्या या भाज्या पौष्टिक तत्वंनी भरपूर असतात, असे निसर्गप्रेमी सांगतात. त्या भाज्यांमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ लाभते, असाही दाखला दिल्या जातो. आर्वी परिसरातील ठराविक गावात पिकणाऱ्या या भाज्यांना स्थानिकच बाजारपेठ लाभते. त्या जर अन्यत्र विकण्यास पाठविल्या तर चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते, असे म्हटल्या जाते. काही गावातील आदिवासिंचे आजही हातावर आणून पानावर खाणे, अशी स्थिती आहे. तेच या भाज्यांचे जाणकार असल्याने तोडून विकायला आणतात. त्यांनीच हा रानमेवा जपला, असे श्रेय त्यांना दिल्या जाते. मध्य जुलै पासून या भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होणार.