नागपूर : दरवर्षी उन्हाळय़ात पाणी प्रश्न उग्र होतो, परंतु यंदा उन्हाची दाहकता मार्चपासूनच जाणवू लागली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या जानेवारी २०२२ च्या अहवालानुसार, राज्यातील ८०८ गावातील भूजल पातळी खोल गेली आहे. राज्यात १ मीटरपेक्षा जास्त घट दर्शवणाऱ्या गावांमध्ये विदर्भातील ३२६ गावांचा समावेश आहे. त्यात अमरावती विभागातील १८५ व नागपूर विभागातील १४१ गावांचा समावेश आहे. इतर विभागात अनुक्रमे नाशिक -१३४, पुणे विभाग- १९५, औरंगाबाद विभागातील १५३ गावांचा समावेश आहे. जानेवारीत घेण्यात आलेल्या नोंदीत अमरावती विभागात ३८ तालुक्यांमध्ये तर नागपूर विभागातील ३२ तालुक्यांमध्ये साधारणपणे ० ते ३० टक्के तूट आढळून आली. इतर विभागाच्या तुलनेत कोकणाची स्थिती चांगली आहे.
२० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा जास्त घट झाल्यास ऑक्टोबरपासूनच टंचाईसदृश्य स्थिती जाणवू लागते. २ ते ३ मीटरने कमी झाल्यास जानेवारीपासून तर १ ते २ मीटरने घट झाल्यास एप्रिलपासून पुढे पाण्याची चणचण सुरू होत, असे अहवालात नमूद आहे. दरम्यान, नागपूर शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करणारी योजना महापालिका राबवत असतानाही अनेक भागात मार्च महिन्यापासूनच पुरवठय़ातील तांत्रिक बिघाडामुळे टंचाई जाणवत आहे. कमी दाबाने व अल्पवेळ होणारा पुरवठा हे या संतापाचे प्रमुख कारण आहे.
भीषण का?
३ मीटरपेक्षा अधिक भूजल पातळी खोल गेलेल्या गावांची संख्या ८० असून २ ते ३ मीटर खोल गेलेल्या गावांची संख्या १०९ आहे. १ ते २ मीटर खोल गेलेली गावे ६१९ आहेत. एकूण संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या ८०८ आहे.
भूजलाची स्थिती
पातळी गावे
३ मीटर ८०
२ ते ३ मीटर १०९
१ ते २ मीटर ६१९
एकूण ८०८