डॉ. काणेंच्या कृतीवर तावडेंची नापसंती

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या नागपूर विद्यापीठातील व्याख्यानाला विरोध निर्थक होता. महाराष्ट्र पुरोगामी राज्य असून प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. दुसऱ्याचे विचार खोडून काढण्याचा अधिकारही आहे. त्यामुळे येचुरींच्या व्याख्यानाला विरोध करण्याचे कारणच काय, असा सवाल राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी करीत नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. सिद्धार्थ काणे यांच्या कृतीवर एकप्रकारे नापसंती दर्शवली.

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीप्रदान समारंभासाठी विनोद तावडे नागपुरात आले होते. या दरम्यान पत्रकारांनी त्यांच्याकडे येचुरींचा विषय उपस्थित केला. त्यावर मत व्यक्त करताना तावडे यांनी येचुरीचे भाषण रद्द करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले. येचुरी चांगले वक्ते असून ते अभ्यासपूर्ण बोलतात. येचुरी संसदेत बोलतात, ते विद्यापीठात बोलले तर बिघडले कुठे? असा प्रश्न त्यांनी केला. शिवाय एखाद्याच्या विचाराचे खंडन करण्याचा अधिकार आपल्याला आहेच, असेही ते म्हणाले.

नागपूर विद्यापीठातर्फे येचुरी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रम दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना कुलगुरूंनी व्याख्यान रद्द केल्याने वाद उद्भवला होता. हे येथे उल्लेखनीय.

कार्यक्रमात  यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी  महाविद्यालयाचे (वायसीसीई) संस्थापक माजी खासदार दत्ता मेघे, आमदार समीर मेघे, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यावेळी उपस्थित होते.

विद्यापीठातील सर्व रिक्त पदे भरणार

येत्या तीन महिन्यात सर्वच विद्यापीठातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्यात येतील, असे तावडे म्हणाले. शासनाने विद्यापीठातील पदभरती संदर्भात काढलेल्या आदेशाचा नवीन अर्थ काढून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकूण पदांच्या चार टक्केच पदे भरण्यात यावे, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आले. यामुळे विद्यापीठांतवरील ताण कमी होणार नाही. विद्यापीठाला रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरायची आहेत. चार टक्के पदभरती संदर्भात कुठलेही नियम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी शासनाने निधीचेही तरतूद केली असून पदे न भरल्यास तो वाया जाईल. त्यामुळे येत्या तीन महिन्यात विद्यापीठात पदे भरण्याच्या कारवाईचे आदेशही देण्यात येतील, असेही ते म्हणाले.