गडचिरोली : घरची परिस्थिती प्रतिकूल, आई मानसिक आजाराने त्रस्त आणि वडिलांचे नुकतेच झालेले निधन… अशा अनेक संकटांनी आयुष्याची वाट अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या परिस्थितीसमोर न झुकता शिक्षणालाच आपली ताकद बनविणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी या छोट्याशा गावातील विशाल मेश्राम या आदिवासी तरुणाने आपल्या जिद्दीच्या बळावर थेट लंडनपर्यंत मजल मारली आहे. जगातील नामांकित शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे. त्याच्या या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाकडून तब्बल ८० लाख २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाणारा गडचिरोली जिल्ह्यातील तो पहिलाच आदिवासी विद्यार्थी ठरला आहे.
विशालचा हा प्रवास केवळ एका विद्यार्थ्याच्या यशाची कहाणी नाही, तर ग्रामीण भागातील परिस्थितीशी झुंज देत स्वप्ने पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे. लखमापूर बोरीसारख्या ग्रामीण भागात बालपण गेलेल्या विशालने बारावीपर्यंतचे शिक्षण चामोर्शी येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले. पुढे बंगळुरू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठात विकास व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे, या शिक्षणासाठीही त्याला शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळाली होती.
मात्र, शिक्षणाच्या या प्रवासामागे सुखाची किंवा संपन्नतेची पार्श्वभूमी नव्हती. विशालच्या आईला मानसिक आजार आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणापासून आजोबांनी त्याचा सांभाळ केला. आर्थिक अडचणी, कौटुंबिक संकटे आणि ग्रामीण भागातील मर्यादित संधी या सगळ्यांशी सामना करत विशालने शिक्षणाची वाट सोडली नाही. उलट प्रत्येक अडचणीला त्याने पुढे जाण्याची प्रेरणा मानले.
स्वतःची वाट चाळतांना इतरांसाठीही प्रकाश
विशालच्या यशाचे वेगळेपण केवळ परदेशातील नामांकित विद्यापीठात निवड होण्यात नाही. स्वतःच्या शिक्षणासाठी संघर्ष करत असतानाच त्याने आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही मनापासून स्वीकारली आहे. गडचिरोलीतील संकल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून तो ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन करीत आहे. देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश कसा मिळवायचा, विविध अभ्यासक्रमांची माहिती कशी घ्यायची, प्रवेश प्रक्रिया काय असते आणि शिष्यवृत्तीच्या संधींचा लाभ कसा घ्यायचा, याबाबत तो विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधतो.
मागील दोन वर्षांत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी विशालने प्रयत्न केले आहेत. विविध कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे आणि प्रत्यक्ष भेटींच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनातील उच्च शिक्षणाबाबतची भीती दूर करण्याचे काम तो करीत आहे. मी ज्या परिस्थितीतून आलो, त्या परिस्थितीतील इतर विद्यार्थ्यांनीही शिकले पाहिजे आणि मोठ्या विद्यापीठांपर्यंत पोहोचले पाहिजे, ही भावना त्याच्या या कामामागे आहे.
एका बाजूला स्वतःच्या आयुष्यातील संकटांशी झुंज देत उच्च शिक्षणाची शिडी चढणारा विशाल आणि दुसऱ्या बाजूला आपल्या गावाकडील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नव्या वाटा शोधणारा विशाल, अशा दोन्ही भूमिका तो एकाच वेळी निभावत आहे. लखमापूर बोरीच्या मातीतून सुरू झालेला हा प्रवास आता लंडनच्या प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेपर्यंत पोहोचला आहे. मात्र, विशालच्या स्वप्नाची दिशा केवळ स्वतःपुरती मर्यादित नाही. त्याला मिळालेली संधी आपल्या गावातील, आपल्या जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठीही नवी दारे उघडणारी ठरावी, अशी त्याची धडपड आहे. त्यामुळे विशालची लंडनकडे झालेली ही भरारी ही केवळ एका तरुणाची वैयक्तिक कामगिरी न राहता, अत्यंत गरीब कुटुंबात आणि गावात जन्मलो म्हणून स्वप्नांची उंची कमी असावी असे नाही, हा विश्वास देणारी प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.
