नागपूर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांत गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे काही रेस्ट्राॅरेंटमध्ये मेन्यू कमी करणे किंवा काही पदार्थ बंद करण्याची वेळ आली आहे. या गॅस तुटवड्याच्या समस्येवर उपाय म्हणून सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ‘विष्णू शेगडी’ हा पर्यायी पर्याय विकसित केला आहे. टाकाऊ वस्तूंमधून तयार होणाऱ्या इंधनावर चालणाऱ्या या शेगडीवर विविध खाद्यपदार्थ सहजपणे तयार करता येतात.
स्वयंपाकाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोगांसाठी विष्णू मनोहर ओळखले जातात. त्यांनी विकसित केलेली विष्णू शेगडी पारंपरिक गॅस शेगडी किंवा चुलीच्या तुलनेत कमी इंधनात अधिक उष्णता निर्माण करते. त्यामुळे अन्न लवकर आणि योग्य पद्धतीने शिजवणे शक्य होते. विष्णू मनोहर यांना स्वयंपाक क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. देश-विदेशात त्यांनी हजारो लोकांसाठी स्वयंपाकाचे अनेक कार्यक्रम केले आहेत.
अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये गॅसचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर, वाढता खर्च आणि उष्णतेचा अपव्यय या समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या. या पार्श्वभूमीवर कमी खर्चात आणि अधिक कार्यक्षमतेने स्वयंपाक करता येईल अशी शेगडी विकसित करण्याचा प्रयोग त्यांनी सुरू केला आणि त्यातून ‘विष्णू शेगडी’ ही संकल्पना आकाराला आली.
बायोमास इंधनावर आधारित शेगडी
विष्णू शेगडीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती बायोमास इंधनावर चालते. या शेगडीत उसाचे चिपाडे, नारळाच्या बुच्या, लाकडाचे छोटे तुकडे, शेतीतील काडीकचरा, लाकडी भुसा तसेच इतर टाकाऊ पदार्थ एकत्र करून तयार केलेल्या कांड्यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. त्यामुळे एलपीजी गॅसवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते आणि स्वयंपाकाचा खर्चही घटतो. ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणाऱ्या या इंधनामुळे ही शेगडी अधिक उपयुक्त ठरू शकते.
रचना आणि कार्यपद्धती
या शेगडीची रचना अशी आहे की इंधन जळताना त्याला आवश्यक तेवढी हवा मिळते. त्यासाठी शेगडीत संगणकामध्ये वापरला जाणारा लहान पंखा बसवण्यात आला आहे. हा पंखा लहान बॅट्रीवर चालतो. तसेच शेगडीतील ज्वाला नियंत्रित करण्यासाठी एक विशेष बटन देण्यात आले आहे. या बटनच्या साहाय्याने ज्वाला कमी- जास्त करता येते.
त्यामुळे ज्वलन अधिक प्रभावी होते आणि निर्माण होणारी उष्णता थेट भांड्याकडे पोहोचते. परिणामी उष्णतेचा अपव्यय कमी होतो आणि अन्न लवकर शिजते. शेगडीच्या वरच्या भागावर मोठी कढई, तवा किंवा भांडे ठेवण्याची सोय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजी, भात, खिचडी तसेच इतर पदार्थ सहज तयार करता येतात.
कमी धूर, जास्त उष्णता
पारंपरिक चुलीत अनेकदा मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. मात्र विष्णू शेगडीच्या विशेष रचनेमुळे इंधन अधिक पूर्णपणे जळते आणि धूर तुलनेने कमी होतो. त्याचबरोबर अधिक तापमान निर्माण होत असल्यामुळे मोठ्या कढयांमध्ये स्वयंपाक करणे सोपे होते आणि वेळेची बचतही होते. गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रेस्ट्राॅरेंट किंवा हाॅटेल बंद करण्याऐवजी अशा पर्यायी साधनांचा वापर करणे अधिक उपयुक्त ठरू शकते, असे मत विष्णू मनोहर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
