नागपूर : खांद्यावरचे ‘आयपीएस’ फक्त मिरवण्यासाठी नाही, तर जनसेवेशी बांधील आहे. मानवी मुल्ये आणि संविधानाशी माझी कटिबद्धता आहे. कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी मी वचनबद्ध आहे. मिळमिळीत वागणे हा माझा स्वभाव नाही. कायदा हाती घेणाऱ्यांना वठणीवर आणणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखणे, कोर पोलिसिंग, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल.
बनावट एन्कांऊटर करणार नाही, पण गुन्हेगारांना सोडणारही नाही, अशा शब्दांत नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी पहिल्याच दिवशी इशारा दिला.

मावळते पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्याकडून नांगरे पाटील यांनी पोलीस मुख्यालयात सोमवारी औपचारिक पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

पुणे, मुंबई आणि नागपूर यापैकी एक संस्थात्मक पोलीस आयुक्तालय मी मागितले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नागपूरला नियुक्ती देऊन जो विश्वास दाखवला, तो सार्थ ठरवण्यास प्राधान्य असेल, असे नमूद करत पोलीस आयुक्त नांगरे पाटील म्हणाले, अहोरात्र काम करण्यासाठी मी या शहरात आलोय. महिलांचे संरक्षण आणि तरुणांना अंमली पदार्थांपासून लांब ठेवण्याला प्राधान्य राहील. ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून जे- जे शक्य आहे, ते- ते मी करेल.

रात्रीची गस्त आवडीचा विषय

खांद्यावरचे ‘आयपीएस’ फक्त मिरवण्यासाठी नाही, तर जनसेवेशी बांधील आहे. मानवी मुल्ये आणि संविधानाशी माझी कटिबद्धता आहे. कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी मी वचनबद्ध आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर मुंबईत १०० निर्भया पथके तयार केली होती. त्याच धर्तीवर नागपुरातही अभियान राबवले जाईल. रात्रीची गस्त हा माझ्या आवडीचा विषय आहे. शहरातला एकेक कोपरा मी पिंजून काढेल. लोकसंख्या आणि भूभागाच्या आधारे आव्हानांचे वर्गिकरण करून त्या त्या भागात पोलीस गस्त वाढवून काम करेल, असेही नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

पोलिसांवर हात माझ्यावर हात

गुन्हेगारांना पोलिसांचा धाक असलाच पाहिजे. पोलीस दलातला प्रत्येक माणूस माझ्या कुटुंबाचा भाग आहे. त्यामुळे पोलिसांवर कोणी हात टाकणार असेल, तर तो माझ्यावर हात टाकण्यासारखा असेल. त्यांच्याशी होणारा अभद्र व्यवहार खपवून घेणार नाही, असे पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावले.