scorecardresearch

जैन समाजाच्या दोन्ही पंथियांना शांततेचे आवाहन; पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची शिरपूरला भेट

भविष्यात वाद होऊ नये यासाठी लोढा यांनी आज २१ मार्च रोजी शिरपूर जैन येथे भेट देऊन आढावा घेतला. दोन्ही पंथियांनी एकत्र येऊन शांततेचे आवाहन केले आहे.

Mangalprabhat Lodha Shirpur
जैन समाजाच्या दोन्ही पंथियांना शांततेचे आवाहन; पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची शिरपूरला भेट (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

वाशीम : जैन समाजाची काशी म्हणून देशात प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्तीला लेपण करण्याच्या कारणावरून आणि मंदिरात बाउन्सर ठेवल्यावरून दिगंबर आणि श्वेतांबर या दोन पंथांमध्ये वादाची ठिणगी पडून प्रकरण हाणामारीपर्यंत गेले होते. २० मार्च रोजी दोन्ही पंथात मनोमिलन झाले होते. या पार्श्वभूमीवर आज २१ मार्च रोजी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिरपूर येथे भेट दिली. त्यांनी भगवान पार्श्वनाथ यांचे दर्शन घेऊन दोन्ही पंथांना शांततेचे आवाहन केले.

मागील तीन चार दिवसांपासून शिरपूर येथे जैन समाजातील दोन पंथात वादावादी होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेले होते. याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. २० मार्च रोजी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी मध्यस्थी करून दोन पंथाचे मनोमिलन घडवून आणले होते. २३ मार्चपासून भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्तीला लेपण करण्याचे ठरले आहे. तसेच पोलीस बंदोबस्तात मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. भविष्यात वाद होऊ नये यासाठी लोढा यांनी आज २१ मार्च रोजी शिरपूर जैन येथे भेट देऊन आढावा घेतला. दोन्ही पंथियांनी एकत्र येऊन शांततेचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी भगवान पार्श्वनाथाचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलीस आणि संस्थानचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा – समृद्धी महामार्गावर वेगाने वाहने चालवणाऱ्यांना समुपदेशनाची सक्ती

हेही वाचा – बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बिएनएचएस) या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह परदेशी

प्राथमिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न

शिरपूर येथील जैन मंदिर अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध आहे. मात्र, येथील रस्ते, नाल्या आणि पायाभूत सुविधांची वानवा आहे. याबाबत लोढा यांना विचारणा केली असता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यापूर्वी ४ कोटी मंजूर केले आहेत. तसेच नादुरुस्त रस्त्याबाबत बांधकाम मंत्री यांना सूचना करून पायाभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 17:27 IST

संबंधित बातम्या