नागपूर : करोनाचा संसर्ग दूर होताच रस्त्यालगत खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. गर्दीच्या रस्त्यावर फास्टफूडची दुकाने वाढली आहेच. माटे चौक-व्हीएनआयटी-अंबाझरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी दररोज रात्री यात्रा भरत असून त्याचा या मार्गाने जाणाऱ्यांना वाहनधारकांना तसेच सामान्य नागरिकांनाही फटका बसत आहे.
ग्राहक रस्त्यावरच वाहन ठेवत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून याकडे वाहतूक पोलीस आणि महापालिकेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. माटे चौक, आयटी पार्क ते अंबाझरी देवी मंदिर चौकासह शंकरनगर चौक ते लक्ष्मीनगर चौक, रेशीमबाग चौक, तीताबर्डी-व्हेरायटी चौकामध्ये फास्टफूडच्या ठेल्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे या रस्त्यांवर सायंकाळपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होते.
माटे चौक ते भरोसा सेल कार्यालयापर्यंत अनेक ठेल्यावर रात्री चायनिज खाणाऱ्यांची गर्दी असते. फास्टफूडचे ठेले रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे कुणाचीही परवानगी न घेता लावले जातात. कुणी नगरसेवक किंवा परिसरातील राजकीय वरदहस्ताने दुकाने थाटतात. फुटपाथवर किंवा रस्त्याच्या कडेला हातठेला लावल्यामुळे ग्राहक त्यापुढेच वाहने उभी करतात. कारचालक कार उभी करून ठेल्यावर चायनिज, मंच्युरियन, न्यूडल्स खातात. कारमुळे अर्धाअधिक रस्ता व्यापला जातो. ठेल्याचा मालकही बिनधास्तपणे त्यांना कारमध्येच नाश्त्याची प्लेट आणि पाण्याची बाटली पुरवतो. ठेल्यासमोर एक जवळपास अर्धा ते पाऊण तास थांबते. नाश्ता करेपर्यंत कुणी कितीही पाठीमागून हॉर्न दिला तरी ते रस्ता सोडत नाहीत. अशी स्थिती या भागात नित्याची झाली आहे.
‘सब सेट हैं भाई..’
फास्टफूड गाडीचालकांचे स्थानिक पोलीस ठाण्यातील डीबी पथकाशी हप्ते बांधलेले असतात. त्यामुळे ठेलेवालाही दुचाकी किंवा कार ठेल्यासमोर लावताना ‘सब सेट है भाऊ.. बिनधास्त गाडी पार्क करो..’ असे सांगतो.
रस्त्यावर लावण्याची परवानगी असते का?
फास्टफूडची गाडी फुटपाथवर लावण्याची कोणतीही परवानगी चालकाकडे नसते. तरीही केवळ महापालिकेचे पथक आणि पोलिसांशी हातमिळवणी करून ते पदपथावर गाडय़ा लावतात. रस्त्यावर ग्राहकांसाठी खुच्र्या लावल्या जातात. फास्टफूडवाल्यांचे मोठमोठे फ्लेक्सबोर्डही रस्त्यावर बिनधास्त ठेवण्यात येतात. त्यांच्या ठेल्यावर किंवा बोर्डवर कधीच जप्तीची कारवाई होत नाही हे येथे उल्लेखनीय.
वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका
फास्टफूडच्या ठेलेचालकांशी वाहतूक पोलिसांचे साटेलोटे असते. त्यांना नि:शुल्क नाश्ता आणि एक खाद्यपदार्थ्यांचे पार्सल मिळते. तसेच महिन्याकाठी मिळणारी मिळकत वेगळी. त्यामुळे आयटी पार्क रोडवर फास्टफूडच्या ठेल्यामुळे नेहमी वाहतुकीची कोंडी असल्यानंतर वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत.
माटे चौक ते आयटी पार्क या दरम्यान रस्त्यावरील फास्टफूड ठेलेचालकांवर नियमित कारवाई केली जाते. गस्त वाहनांकडून रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाचालकांवरही कारवाई करण्यात येते. स्थानिक पोलीस ठाण्यातूनही कारवाई होणे गरजेचे आहे. – अमित डोळस, प्र. सहायक पोलीस आयुक्त. वाहतूक विभाग
महिन्याभरापूर्वी कारवाई केली होती. पोलीस संरक्षण घेऊन आम्ही पुन्हा मोठी कारवाई करू. २२ पैकी नऊच पोलीस कर्मचारी महापालिकेला संरक्षणासाठी मिळाले असून पोलिसांची संख्या वाढताच पुन्हा मोठय़ा प्रमाणात कारवाई केली जाईल.- अशोक पाटील, अतिक्रमण विभाग, महापालिका.