नागपूर : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी टप्प्या टप्प्यात सर्व राज्यात विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेमुळे काही राज्यातील कोट्यवधी मतदारांचे नावे वगळण्यात आलीत. लाखो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. नागरिकांना कागदपत्र सादर न केल्याने त्यांचे नाव कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तर पश्चिम बंगाममध्ये कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे मतदारांचे नाव कमी झाल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले होते. ही प्रक्रिया सत्ताधारी भाजपच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. आता ही प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. एसआयआर अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदणीसाठी २००२ च्या मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहेत. नसल्यास काही कागदपत्र सादर करावी लागणार आहेत.

निवडणूक आयोगाने नमूद केलेला मागील विशेष संक्षिप्त पुनरिक्षणामधील मतदार यादीतील तपशील उपलब्ध नसल्यास किया डेटाबेसशी जुळत नसल्यास संबंधित मतदारास तर नोदणी अधिकारी यांचेकडून नोटीस देण्यात येईल. नोटीस प्राप्त झाल्यानंतर, मतदारांना कागदपत्र सादर करावी लागणार आहे.

जन्माच्या वर्षानुसार वर्गीकरण

  • ०१/०७/१९८७ पूर्वी भारतात जन्म झाला असल्यास स्वत:करिता जन्मतारीख आणि/किंवा जन्मस्थल सिद्ध करण्यासाठी खालील यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • ०१/०७/१९८७ ते ०२/१२/२००४ दरम्यान भारतात जन्म झाला असल्यास स्वत: करिता जन्मतारीख आणि/किंवा जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी खालील यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • जन्मतारीख आणि/किंवा जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी वडील किंवा आई यांचे खालील यादीतील कोणतेही कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • ०२/१२/२००४ नंतर भारतात जन्म झाला असल्यास स्वत: करिता जन्मतारीख आणि/ किंवा जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी खालील यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.

या कागदपत्रांची आवश्यकता

  • जन्मतारीख आणि/किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे, वडिलांचे, खाली नमूद यादीतील कोणतेही कागदपत्र सादर करावे.
  • जन्मतारीख आणि/किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे, आईचे, खाली नमूद यादीतील कोणतेही कागदपत्र सादर करावे.
  • पालकांपैकी कोणीही भारतीय नागरिक नसल्यास, मतदाराच्या जन्माच्या वेळीचे संबंधित व्यक्तीचा वैध पासपोर्ट व व्हिसाची १ प्रत सादर करावी.
  • भारताबाहेर जन्म झाला असल्यास विदेशस्थित भारतीय दूतावास/मिशन यांनी जारी केलेल्या जन्म नोंदणीच्या पुराव्याची प्रत जोडावी.
  • नोंदणीकरण/नागरिकीकरणाद्वारे भारतीय नागरिकाच प्राप्त केले असल्यास (नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
  • कागदपत्रांची सूचक (सर्वसमावेशक नसलेली) यादी (वरीलप्रमाणे नमूद असल्यास, स्वत:, वडील व आई यांच्याकरिता स्वतंत्र स्व-प्रमाणित कागदपत्रे सादर करावित)

१. केंद्र शासन/राज्य शासन/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) यांचे नियमित कर्मचारी अथवा निवृत्तीवेतनधारकांना निर्गमित करण्यात आलेले कोणतेही ओळखपत्र/निवृत्तीवेतन प्रदान आदेश

२. शासन/स्थानिक प्राधिकरण/बैंक/टपाल विभाग/एलआयसी/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) यांच्यामार्फत भारतात निर्गमित करण्यात आलेले दिनांक ०१.०७.१९८७ पूर्वीचे कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र/दस्तऐवज

३. सक्षम प्राधिकरणामार्फत निर्गमित केलेले जन्म प्रमाणपत्र

४. पारपत्र

५. मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठ यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेले मॅट्रिक्युलेशन/शैक्षणिक प्रमाणपत्र

६. सक्षम राज्य प्राधिकरणामार्फत निर्गमित करण्यात आलेले कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र.

७. वनहक्क प्रमाणपत्र

८. सक्षम प्राधिकरणामार्फत निर्गमित करण्यात आलेले इतर मागासवर्गीय/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अथवा इतर जात प्रमाणपत्र.

९. राष्ट्रीय नागरिक नोंदवही (ज्या ठिकाणी लागू असेल तेथे)

१०. शासकीय अधिकाऱ्यांमार्फत कोणत्याही सांविधानिक/ क्रशासकीय नियमानुसार जतन केलेली कौटुंबिक नोंदवही

११. शासनामार्फत निर्गमित केलेले जमीन घर वाटप प्रमाणात्र

१२. आधार करिता, आयोगाचे पत्र क्र. २३/२०२५-ERS/WI. ॥ दिनांक ०९.०९.२०२५ (परिशिष्ट-1) अन्वये निर्गमित केलेले निर्देश लागू राहतील.