VPL Auction Details: नागपूर : आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षटकात तीन बळी घेत खळबळ उडवणारा विदर्भाचा वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगे याला व्हीपीएलच्या लिलावात मात्र केवळ त्याच्या मूळ किंमतीवर समाधान मानावे लागले, हे या लिलावातील सर्वात मोठे आश्चर्य ठरले. हिंगेला २.५ लाख रुपयांतच लिलाव झाला, तर भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव यालाही त्याच मूळ किंमतीत नागपूर हिरोजने आपल्या ताफ्यात घेतले.

याउलट, दुसऱ्या बाजूला अपूर्व वानखेडे हा लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्या २.५ लाखांच्या मूळ किंमतीवरून सुरू झालेल्या बोलीने थेट ८.२ लाखांचा टप्पा गाठला आणि नागपूर हिरोजने चुरशीच्या स्पर्धेनंतर त्याला संघात सामील करून घेतले. प्रसिद्ध क्रीडा सूत्रसंचालक चारू शर्मा यांच्या उपस्थितीत हा लिलाव पार पडला.

कोण ठरले महागडे?

ऑरेंज टायगर्सनेही आक्रमक भूमिका घेत विशेष राम तिवारीला ७ लाख, तर ध्रुव शोरीला ५ लाख रुपयांत विकत घेतले. विदर्भाचा अष्टपैलू नचिकेत भुटे याला भारत रेंजर्सने ६.६ लाखांना घेतले. पगारिया स्ट्रायकर्सने अनुभवी आर. संजयसाठी ६.२ लाख खर्च केले, तर दर्शन नळकांडे यालाही इंडिया वॉरियर्सने ६.२ लाखांत आपल्या ताफ्यात घेतले. कुणाल नगरसारख्या खेळाडूवर ६ लाखांची बोली लागणे हे देखील आश्चर्यकारक ठरले.

दरम्यान, विदर्भाचा मर्यादित षटकांचा कर्णधार हर्ष दुबे यालाही अपेक्षेपेक्षा कमी, म्हणजेच ३.२ लाख रुपये मिळाले. तो गतविजेत्या नेको मास्टर ब्लास्टर संघाकडून खेळणार आहे. प्रत्येक संघाने रिटेन्शनसह एकूण १६ खेळाडू निवडून सुमारे ४२ लाखांच्या बजेटमध्ये संघरचना पूर्ण केली. व्हीपीएलचा दुसरा हंगाम १ ते १४ जून २०२६ दरम्यान रंगणार आहे.

महिला संघांची घोषणा, लिलाव नाही

व्हीपीएल गव्हर्निंग कौन्सिलने महिला स्पर्धेतील चार संघांची घोषणा केली असून, यावेळी महिला खेळाडूंसाठी लिलाव घेण्यात आला नाही. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या महिला निवड समितीने थेट संघनिवड केली. पगारिया स्ट्रायकर्स हा चौथा संघ नव्याने सहभागी झाला आहे. दरम्यान, मागील हंगामात नेको मास्टर ब्लास्टरकडून खेळलेली भारती फुलमाळी हिची इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याने ती स्पर्धेत खेळणार नाही. तिच्या अनुपस्थितीत श्रद्धा नबिरा हिला संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.