वर्धा : जनगणना आपल्या सर्वांच्या परिचयाचा शब्द. त्या पाठोपाठ व्याघ्रगणना माहित. पण निसर्ग सृष्टीत तेवढाच मोलाचा जीव म्हणजे पक्षी पण आहे. विविध पक्षी हे पर्यवरण व अन्न साखळीत महत्वाचे योगदान देत असल्याचे शालेय पातळीवर सांगितल्या जात असते. आता तर असंख्य पक्षी हे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची आकडेवारी आहे. म्हणुन तनमोर, माळढोक, गिधाडे व अन्य पक्षी जपल्या जात असून शासकीय स्तरावर त्यांचे संगोपन केल्या जात आहे. येथील बहार या पक्षीमित्र संघटनेचे पदाधिकारी व जीवशास्त्रज्ञ दर्शन दुधाने म्हणतात की या पक्षी गणनेत आवर्जून सहभागी झाले पाहिजे.
या संस्था करणार गणना
वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर – इंडिया ( WWF India ) व बर्ड काऊंट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही गणना होत आहे. अत्यंत दुर्मिळ म्हणुन या गणणेस Vulture Count – 2026 असे नाव देण्यात आले आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मात्र गेल्या काही दशकांत झपाट्याने नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचलेल्या गिधाडांच्या संरक्षणासाठी आता देशपातळीवर एक मोठी चळवळ उभारली जात आहे. या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ पक्षीतज्ज्ञच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकही थेट सहभागी होऊन गिधाडांच्या गणनेत मोलाचे योगदान देऊ शकतात.
स्वच्छतादूतांचे रक्षण गरजेचे
गिधाडे ही निसर्गातील सर्वात प्रभावी ‘स्वच्छतादूत’ मानली जातात. मृत जनावरांचे अवशेष खाऊन ती परिसरात घातक आजार आणि रोगराई पसरण्यापासून रोखतात. परंतु विषारी औषधांचा वापर, खाद्यकमी होणे आणि अधिवासाचा विनाश यांमुळे देशातील गिधाडांची संख्या चिंताजनक पातळीवर खाली आली आहे. ही धोक्याची घंटा ओळखून, त्यांच्या सध्याच्या लोकसंख्येची आणि वितरणाची अचूक माहिती गोळा करण्यासाठी या ‘सिटिझन सायन्स’ (Citizen Science) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिनाभर चालणार प्रत्यक्ष सर्वेक्षण मोहीम
हा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत महिनाभर राबवला जाणार आहे.
गिधाडांचे निरीक्षण होणार
या काळात सहभागी लोकांना आपल्या परिसरातील उघड्या माळरानांवर, जंगलांत किंवा नैसर्गिक ठिकाणी जाऊन गिधाडांचे निरीक्षण करायचे आहे. निरीक्षणादरम्यान दिसणाऱ्या गिधाडांची नोंद ‘ई-बर्ड इंडिया’ (eBird India) या डिजिटल व्यासपीठावर अपलोड करावी लागणार आहे. या जमा झालेल्या डेटाच्या आधारे संशोधकांना गिधाडांच्या प्रजाती, त्यांचे वसतिस्थान आणि त्यांच्या संरक्षणासाठी भविष्यातील धोरणे आखणे सोपे होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पक्षीप्रेमी आणि नागरिकांना ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत क्यूआर (QR) कोडद्वारे नागरिक थेट आपली नोंदणी करू शकतात.
पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या या मोलाच्या घटकाला वाचवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी, विशेषतः तरुण पिढीने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘WWF India’ कडून करण्यात आले आहे. निसर्गाचे हे वैभव जपण्यासाठी नागरिकांचे एक पाऊलही गिधाडांच्या प्रजातीला नवसंजीवनी देऊ शकते.
