नागपूर : आदिवासीबहुल आणि दुर्गम अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला रेल्वेच्या नकाशावर आणण्याच्या दिशेने महत्त्वाची पायरी पूर्ण झाली आहे. वडसा-आरमोरी नव्या रेल्वेमार्गावर वेग चाचणी घेण्यात आली असून सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर या मार्गावर रेल्वेसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
२० किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत वडसा-गडचिरोली ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. एकूण ५२ किलोमीटरच्या या मार्गातील वडसा ते आरमोरी हा सुमारे २० किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या मार्गावर २१ सप्टेंबर रोजी मुख्य रेल्वे संरक्षा आयुक्त सुमीत सिंघल यांच्या उपस्थितीत रेल्वे निरीक्षण करण्यात आले. नव्याने बांधण्यात आलेल्या मार्गाची सुरक्षा, तांत्रिक व्यवस्था तसेच रेल्वे संचालनासाठी आवश्यक बाबींची पाहणी करण्यात आली. त्यानंतर निर्धारित कार्यक्रमानुसार वेग चाचणी घेण्यात आली. नव्या ब्रॉडगेज मार्गाच्या कमिशनिंग प्रक्रियेत ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
आरमोरी-गडचिरोली कामाला वेग
वडसा ते आरमोरी हा पहिला टप्पा पूर्ण झाला असला, तरी आरमोरी ते गडचिरोली या उर्वरित ३२ किलोमीटर मार्गाचे काम सुरू आहे. संपूर्ण मार्ग गडचिरोली जिल्हा मुख्यालयापर्यंत नेण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कामाला गती देण्यात येत आहे. गडचिरोलीपर्यंत रेल्वे पोहोचल्यास जिल्ह्याचा राज्यातील तसेच देशातील अन्य भागांशी संपर्क अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. सध्या दळणवळणासाठी प्रामुख्याने रस्ते वाहतुकीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
मालवाहतुकीलाही मिळणार चालना
गडचिरोलीतील कृषी उत्पादनांसह स्थानिक व्यापारातील माल आणि औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीसाठीही रेल्वे उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. रेल्वेमुळे मालवाहतुकीचा खर्च आणि वेळ कमी होण्यास मदत होऊ शकते. जिल्ह्यातील खनिजसंपत्ती आणि औद्योगिक क्षमतेच्या पार्श्वभूमीवर या रेल्वेमार्गाकडे आर्थिक विकासाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. रेल्वे संपर्कामुळे उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही रेल्वे संपर्क महत्त्वाचा ठरू शकतो.
मंजुरीनंतर रेल्वेसेवेचा मार्ग मोकळा
वडसा-आरमोरी मार्गावरील वेग चाचणी पूर्ण झाल्याने प्रत्यक्ष रेल्वेसेवा सुरू करण्यापूर्वीची महत्त्वाची सुरक्षा प्रक्रिया पुढे सरकली आहे. आता रेल्वे संरक्षा आयुक्तांची मंजुरी आणि निर्धारित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर रेल्वेसेवा सुरू करता येणार आहे. सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर वडसा ते आरमोरी रेल्वेमार्गाची स्पीड ट्रायल झाली आहे. सुरक्षा आयुक्तांचा हिरवा कंदील मिळताच या मार्गावर रेल्वेगाडी धावू शकेल, असे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिलीपसिंह यांनी सांगितले.
