नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून लांबलेल्या राज्यातील महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू झाली. नव्या कार्यक्रमाअंतर्गत मंगळवारी प्रभागरचनेचा अंतिम आराखडा जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्षांचे डोळे निवडणुकीच्या घोषणेकडे लागले आहे. दरम्यान, किरकोळ बदलांसह जुन्याच आराखडय़ावर आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे.

१ फेब्रुवारी रोजी प्रभागरचना तयार करून प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. मंगळवारी आयोगाने प्रभागांचा अंतिम आराखडा जाहीर केला. त्यानुसार, नागपूर शहरातील प्रभाग-४८ मधील काही भाग प्रभाग-२९ ला जोडण्यात आला आहे तर प्रभाग-४६ मधील भाग प्रभाग-२९ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हे किरकोळ बदल वगळता कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, अंतिम प्रभाग रचनेनुसार आता प्रभाग-२९ हा लोकसंख्येनुसार सर्वात मोठा प्रभाग ठरला आहे. या प्रभागाची लोकसंख्या ५४ हजार  ९२ इतकी असणार आहे. प्रभाग ४८ हा लोकसंख्येनुसार शहरातील सर्वात लहान प्रभाग ठरला आहे. या प्रभागाची लोकसंख्या ४१ हजार  ९२ इतकी आहे. यंदा महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभागपद्धतीने होणार आहे. लोकसंख्येच्या आधारावर नगरसेवकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा महापालिकेत १५६ नगरसेवक निवडून जातील. प्रभागाच्या प्रारूप आराखडय़ावर भाजपने आक्षेप घेतला होता. विशेषत: पालकमंत्री नितीन राऊत यांनी उत्तर नागपुरातील अनेक प्रभाग भाग तोडले,असा दावा केला होता. याबाबत आक्षेपही नोंदवण्यात आले होते. मात्र, ते ग्राह्य धरण्यात आले नाहीत. प्रभाग रचना अंतिम झाल्यामुळे आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष निवडणुकांच्या तारखांकडे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर इच्छुक पुन्हा कामाला लागले आहेत. कार्यक्रमांची संख्या वाढली असून मोर्चेबांधणी केली जात आहे.

ज्येष्ठ नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकणार

प्रभागरचनेत सध्या ३८ प्रभागांची संख्या ५२पर्यंत वाढल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे.  दुसरीकडे सध्याच्या प्रभागांमधील अनेक वस्त्या नव्याने तयार झालेल्या प्रभागांना जोडल्याने अनेक ज्येष्ठ नगरसेवक ऐकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.

शहराचे चित्र

  • एकूण लोकसंख्या : २४ लाख ४७ हजार ४९४
  • अनुसूचित जातीची लोकसंख्या : ४ लाख ८० हजार ७५९
  • अनुसूचित जमातीची लोकसंख्या : १ लाख ८८ हजार ४४४
  • एकूण सदस्य संख्या : १५६
  • एकूण प्रभाग :  ५२
  • सर्वात मोठा प्रभाग : २९ (५४ हजार ०९२)
  • सर्वात लहान प्रभाग : ४८ (४१ हजार ०९२)