वॉर्ड पद्धतीमुळे निवडणुकीतील चुरस वाढणार!

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सध्या चार सदस्यीय प्रभाग पद्धत अस्त्विात आहे.

महापालिका निवडणुकीत प्रभाग पद्धती बाद; सत्ताधाऱ्यांचा कस लागणार, विरोधकांमध्ये समाधान

नागपूर :  महापालिका निवडणुकीत प्रभाग पद्धती बाद झाल्याने निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.  निवडणुका एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने होणार असल्याने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत संघटनात्मक पाठबळाच्या जोरावार सलग १५ वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला यावेळी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे प्रभाग पद्धतीत तग धरू न शकणाऱ्या काँग्रेससह  इतर विरोधी पक्षांच्या या नव्या पद्धतीने आशा पल्लवीत झाल्या आहेत.  त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सध्या चार सदस्यीय प्रभाग पद्धत अस्त्विात आहे. एकूण प्रभागांची संख्या ३८ आहे. त्यातून १५१ सदस्य निवडून  आले. त्यात भाजपचे १०८  सदस्य आहेत. परंतु, आता आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग पद्धती संपुष्टात आली आहे. त्यामुळे सदस्य संख्या न वाढल्यास ३८ प्रभागाचे १५१ वॉर्डात विभाजन होईल. वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ही भाजपच्या पथ्यावर पडणारी होती. याच पद्धतीमुळे मागील १५ वर्षांपासून महापालिकेवर एकहाती सत्ता कायम ठेवण्यात पक्षाला यश मिळाले. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत एका प्रभागाचा आकार जवळजवळ विधानसभा मतदारसंघाइतका आहे. संघटनात्मक पाठबळ भक्कम असलेल्या पक्षालाच येथून विजय मिळवणे शक्य होते. याचाच फायदा २०१७ च्या व त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजपला झाला होता. २०१७ मध्ये पक्षाचे  १०८ सदस्य विजयी झाले होते. प्रभाग पद्धतीचा सर्वात अधिक फटका काँग्रेसला बसला. संघटनात्मकदृष्ट्या खिळखिळ्या झालेल्या या पक्षाला व इतरही विरोधी पक्षाला प्रभागात भाजपने निर्माण केलेले आव्हान मोडून काढता येत नव्हते. बंडखोरी व इतर कारणांमुळे  त्यांना यश मिळवणे अवघड झाले होते. त्यामुळेच बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करावी, अशी मागणी, काँग्रेस-राष्ट्रवादीसह सेनेनेही केली होती. यामुळे काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले तर भाजपनेही नव्या रचनेमुळे पक्षाच्या यशावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या महापालिकेत १५१ सदस्य आहेत. हुडकेश्वर नरसाळा, रनाळासह इतर काही शहराला लागून असलेला पण ग्रामीणमध्ये समाविष्ट असलेला भाग महापालिका हद्दीत जोडला जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर सदस्यसंख्या वाढेल. त्यामुळे वार्ड रचनेतही बदल करावा लागणार आहे.

वार्ड ते प्रभाग रचनेचा  प्रवास

२००२ च्या महापालिका निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग होता. २००७ मध्ये पुन्हा एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणूक झाली. २०१२ मध्ये पुन्हा प्रभाग झाले. २०१७ मध्ये हीच पद्धत कायम राहिली. या दोन्ही निवडणुका भाजपने जिंकल्या होत्या. २०१७ मध्ये तीन ऐवजी चार सदस्यांचा प्रभाग झाला. या निवडणुकीतही भाजपला घवघवीत यश मिळाले. २०२२ मध्ये पुन्हा एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणुका होणार आहेत.

सदस्य संख्या वाढणार?

२००७ च्या निवडणुकीत १३६ सदस्य होते. २०१२ मध्ये ही संख्या १४५ वर गेली. २०१७ मध्ये ही १५१ झाली. आता २०२२ मध्ये शहराचा झालेला विस्तार बघता वार्डाची संख्या वाढण्याची  शक्यता आहे.

प्रभाग पद्धतीचा नागरिकांनाही त्रास

प्रभाग मोठा असल्याने व चार सदस्य येत असल्याने वस्त्यांचे काम कोणाला सांगायचे, असा प्रश्न लोकांना पडत होता. नगरसेवकही परस्परांकडे बोट दाखवायचे. आता प्रत्येक वॉर्डात  एकच सदस्य राहणार असल्याने  आपला प्रतिनिधी कोण हे लोकांना कळेल व त्याला जबाबदारही धरता येईल.

महापालिके तील पक्षीय बळ

एकूण सदस्य – १५१

भाजप – १०८

काँग्रेस – २९

बसपा – १०

इतर – ०४

एक सदस्यीय असो की चार सदस्यीय. पंधरा वर्षात केलेल्या कामांमुळे भाजपला भय नाही. यापूर्वी एक सदस्यीय निवडणुकीतही भाजप विजयी झाला आहे. – आ. प्रवीण दटके, शहर अध्यक्ष, भाजप.

एक सदस्यीय वार्ड पद्धतीमुळे कार्यकर्त्यांना सधी मिळेल. नगरसेवकांनाही काम करण्याची संधी मिळणार आहे. काँग्रेसने बुथपातळीवर काम सुरू केले आहे. या पद्धतीचा  पक्षाला फायदाच होईल. – आ. विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ward system will increase the turnout in the elections akp

ताज्या बातम्या