वर्धा : मानवी वस्तीत वन्य जीवांची भटकंती नवी नाही. वस्ती वाढणार आणि जंगल आक्रसणार, हे आता नित्याचे. म्हणुन बिबट, वाघ, अस्वल, रोही व अन्य प्राणी फेरफटका मारण्यास गावात येण्याचे प्रकार वर्धा जिल्हावासि्यांना नवे नाही. बिबट तर नेहमीचा पाहुणा. पण आज त्याच्या जीवावर बेतता बेतता राहले. अथक प्रयत्न आणि बिबटास शेवटी सुखरूप त्याच्या घरी पाठविण्यात यश आले.

CAD मध्ये बिबट वर्दळ

जिल्ह्यात पुलगाव येथे संरक्षण मंत्रालयाचे केंद्रीय दारुगोळा भांडार आहे. हा परिसर हजारो हेक्टर क्षेत्रात पसरलेला. त्यात काही जंगल क्षेत्र पण आहेच. त्यात बिबटयाची राहुटी ठरलेली. अनेकदा ईथुन बिबट पकडण्यात आल्याचे वन्यजीवप्रेमी व रेसक्यू ऑपेरेशन मध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारे आशीष गोस्वामी सांगतात. याच CAD म्हणजेच Central Ammunition Depot या भांडार परिसरात बिबट संरक्षक जाळीत अडकला असल्याची माहिती मिळाली. जाळ्यात अडकल्याने तो सुटण्याची तडफड करीत असून हिंस्त्र होत चालल्याचे वन खात्यास कळविण्यात आले.

वन विभाग घटनास्थळी

ही माहिती कळताच जिल्हा उपवनसंरक्षक हरिवीर सिंग हे आपल्या चमूसह भांडार परिसरात पोहचले. सोबत आशीष गोस्वामी, कौस्तुभ गावंडे, करुणाश्रमचे डॉ. अक्षय गिरी हे पण होते. तडफड करणाऱ्या बिबट्यास ताब्यात घेणे सोपे नव्हते. कारण हा बिबट जाड वायरच्या फासात अडकला होता. शेवटी पण कौशल्य पणास लावून या बिबट्यास पकडण्यात शेवटी यश आलेच. डॉ. गिरी यांनी १५ फूट अंतराहून त्यास डार्ट ( इंजेक्शन ) केले. त्यात तो मग निपचित हाती लागला. पिंजऱ्यात पकडून त्याची रवानगी खरांगना जंगल क्षेत्रात करण्यात आली.

काम यांनी केले फत्ते…

या रेसक्यू ऑपेरेशनमध्ये DFO सिंग व प्रामुख्याने प्राण्यांच्या करुणाश्रमचे गोस्वामी, गावंडे, डॉ. गिरी, वन खात्याचे वैशाली भलावी, माधव माने, के. व्हि. राठोड, पारस बडदे, व्हि. एम. नरांजे, वैशाली कोंडे व अन्य सहभागी झाले होते. बिबट या फासात अडकन्याचे एक कारण सांगितल्या जाते. या परिसरात मोठया प्रमाणात रान डुकरं आहेत. त्यांना पकडण्यासाठी काही शिकारी फास लावून ठेवतात. हे नेहमीचेच. मात्र आज त्यात मोठा नर बिबट अडकला. पण त्याचा जीव वाचला.