वर्धा : नशिबाने दिली साथ असे म्हणणारे मोठ्या संख्येने तर नशीब वैगेरे काही नसते हो, कर्म महत्वाचे, यावर विश्वास ठेवून वाटचाल करणारे आहेतच. पण या घटकास खोटी ठरविणारीही घटना म्हणता येईल. पाण्यात मोबाईल भिजला तर तो चालणे कठीणच, हे कोणीही सांगणार. पण चक्क पुरात ३०० फूट वाहून गेल्यावर आणि मध्ये झाडाच्या फांदीवार लटकून ८ तास भर पावसात राहणाऱ्या या युवकाचे प्राण केवळ हाती असलेला मोबाईल सुरक्षित असल्यानेच वाचला.

अशी घडली घटना

हिंगणघाट तालुक्यातील टाकली येथील यशोदा नदीस मोठा पूर गुरुवारी रात्री आला. त्यातच या नदीवरील पुलावरून देवळी येथील अक्षय माटे हा युवक चालला होता. पुलावरील पाण्याचा अंदाज नं आल्याने तो पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेला. अखेर ३०० फुटावर एक झाड दिसले. त्यास अक्षय लटकून राहला. सायंकाळची ही घटना.

मोबाईलने दिली साथ

भर पावसात झाडाचा आधार घेऊन लटकत राहलेल्या अक्षयला मोबाईल आठवला. त्याने तो तपासला. तर इतक्या पाण्यात राहूनही मोबाईल ‘ जिवंत ‘ असल्याचे समजताच अक्षयला धीर आला. त्याने संपर्क करणे सूरू केले. स्थानिक प्रशासनास माहिती मिळाली आणि शोधकार्य सूरू झाले. प्रथम जिल्हा आपत्ती निवारण दल घटनास्थळी पोहचले. ते अपुरे म्हणुन मग नागपुरातून राज्य आपत्ती निवारण दलास पचारण करण्यात आले. ते रात्री १२ वाजता पोहचले.

असे गाठले युवकास

या दोन्ही टीम्स तर आल्या पण त्यांना वाटा ठाऊक नव्हत्या. त्यांनाही मार्ग या युवकांनेच दाखविला. गुगलमूळे लोकेशन कळले, पण नेमके झाड कुठाय हे कळत नव्हते. संकटातील युवकाने पुन्हा हातातील मोबाईलची मदत घेतली. मोबाईलचा टॉर्च सूरू करीत त्याने बोटीत बसलेल्या बचाव पथकस दिशा दाखविली. अखेर या पथकाने अक्षयला सोडवून आणलेच. हे कार्य आज पहाटे ४ वाजता आटोपले. अशी मोबाईलची साथ मिळाल्याने बचाव कार्य यशस्वी झाल्याचे जिल्हा आपत्ती निवारण कक्षाचे शुभम घोरपडे सांगतात. मोबाईलची साथ मिळाली नसती तर कोण आले असते वाचवायला, असा प्रश्न नशीब बलवत्तर म्हटल्या जाणाऱ्या अक्षयला पडला नसेल तर नवलच. या भागात वाहणारी यशोदा नदी ही मोठा पाऊस झाला की लगेच दुथडी भरून वाहते. दरवर्षी या नदीच्या पुराने अनेक संकटात सापडले आहे. पण अखेर देव तारी, त्याला कोण मारी, असाच अनुभव संकटग्रस्त घेत असतात.