वर्धा, निवडणुकीच्या काळात आश्वासनांची भरमार असते. सत्ताधारी असेल तर मोठमोठी कामांची हमी देत मते मागितल्या जातात. वर्धेचे खासदार अमर काळे यांनी तळेगाव येथील ३०० खाटांच्या नियोजित जिल्हा रुग्णालयाबाबत केलेले विधान आता त्यांच्यावरच उलटल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काळे यांनी तळेगाव येथे झालेल्या या रुग्णालयाच्या घोषणेला ‘भाजपचे लॉलीपॉप’ असे संबोधून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली होती
भाजप उमेदवार सुमित वानखेडे यांनी आर्वी मतदारसंघात मोठे रुग्णालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. हे रुग्णालय झाल्यावर आर्वी, आष्टी व कारंजा या तीन तालुक्यातील गरजू रुग्णांना वर्धा मुख्यालयी किंवा अन्य जिल्ह्यात उपचारासाठी जावे लागणार नाही. हे रुग्णालय होणारच, अशी खात्री वानखेडे यांनी मतदारांना दिली होती.आता याच रुग्णालयाच्या कामाची अधिकृत टेंडर नोटीस प्रसिद्ध झाली आहे. म्हणून तळेगाव येथे घोषित रुग्णालय हे लॉलीपॉप असल्याचा काळेंचा दावा सपशेल फोल ठरल्याची चर्चा सूरू झाली आहे. सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.
जाहीर सभेत बोलताना खासदार अमर काळे यांनी आमदार सुमित वानखेडे आणि राज्य सरकारवर निशाणा साधताना म्हटले होते की, “तळेगावला ३०० खाटांचे रुग्णालय होणार, हे केवळ निवडणुकीच्या तोंडावर दिलेले लॉलीपॉप आहे.” या प्रकल्पाची खिल्ली उडवत हे रुग्णालय कधीही प्रत्यक्षात येणार नाही, असा सूर त्यांच्या भाषणातून उमटला होता.
तळेगाव हे नागपूर, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांच्या मध्यभागी असल्याने येथे अत्याधुनिक रुग्णालय व्हावे, ही आमदार सुमित वानखेडे यांची भूमिका राहली. म्हणून केवळ घोषणा न करता शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार वानखेडे यांचे सख्य लपून नाही.
आमदार वानखेडेंच्या या जिद्दीमुळेच केवळ मंजुरीच मिळाली नाही, तर तब्बल १५५ कोटी ८४ लाख रुपयांचा निधीही त्यांनी खेचून आणला. आज या कामाची अधिकृत ई-निविदा प्रसिद्ध झाल्याने हे स्वप्न आता प्रत्यक्ष साकार होण्याच्या दिशेने वेगाने पाऊल पडले आहे. या अधिकृत सरकारी निर्णय आहे.
सोशल मीडियावर सध्या अमर काळेंच्या त्या भाषणाचा व्हिडिओ आणि सरकारी टेंडरची प्रत यांचे ‘कोलाज’ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ‘कामाला क्षमता लागते, केवळ टीका नाही’ अशा कमेंट्सचा पाऊस पडत असून, या संपूर्ण प्रकरणामुळे खासदार अमर काळे यांची राजकीय कोंडी झाल्याचे म्हटल्या जाते. सुमित वानखेडेंनी प्रत्यक्ष कामातून उत्तर दिल्याची बाब चर्चेत आली आहे.

