वर्धा: भाजप हा कार्यकर्त्यांना नेहमी विविध कार्यक्रम देणारा पक्ष, अशी ओळख दिल्या जाते. राष्ट्रीय व राज्य पातळीवार तसे उपक्रम भाजप संघटना राबवित असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा रेडिओवरून प्रसारित होणारा असाच एक उपक्रम. तो लोकांपर्यंत जावा म्हणून पक्षीय यंत्रणा सक्रिय असते. त्यासाठी बूथ पातळीवार या उपक्रमचे नियोजन केल्या जात असते. पक्ष असे आयोजन करण्याच्या सूचना देतांनाच त्याची नोंद पण ठेवतो. कोणत्या आमदाराने किती ठिकाणी या उपक्रमाचे जाहीर आयोजन केले व त्यास कसा प्रतिसाद लाभला, याचाही हिशोब असतो. तोच जाहीर झाला आहे.

सलग पाचव्यांदा अव्वल

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३६ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या बूथस्तरीय आयोजनामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघाने सलग पाचव्यांदा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून एक नवा इतिहास रचला आहे. आमदार सुमित वानखेडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आर्वी विधानसभा क्षेत्राने ही कामगिरी बजावली. विशेष म्हणजे आर्वीच्या या यशाचा सकारात्मक प्रभाव वर्धा जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांवरही दिसून आला असून राज्यातील पहिल्या चार क्रमांकांमध्ये वर्धा जिल्ह्यातील तब्बल तीन विधानसभा मतदारसंघांनी बाजी मारली आहे. यामुळे संपूर्ण वर्धा जिल्हा भाजपमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया आहे.

अशी आहे आकडेवारी

पक्षाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार आर्वी विधानसभा मतदारसंघातील सर्व ३१० बूथवर (१००% कव्हरेज) ‘मन की बात’ कार्यक्रमाचे अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात तब्बल ५,६०५ नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पंतप्रधान मोदींचे विचार ऐकले. आमदार सुमित वानखेडे यांनी आखून दिलेली रणनीती, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद आणि उत्कृष्ट मायक्रो-मॅनेजमेंटमुळेच आर्वी विधानसभेला हे यश मिळवता आले आहे. आर्वीतील कार्यकर्त्यांना प्रथम स्थानावर राहण्याची आवड आता संपूर्ण जिल्ह्यासाठी एक वस्तूपाठ ठरत आहे.

महाराष्ट्रातील टॉप-४ मध्ये वर्धा जिल्हा

आर्वी विधानसभेच्या या घवघवीत यशापाठोपाठ वर्धा जिल्ह्यातील इतर मतदारसंघांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यातील क्रमवारीत हिंगणघाट विधानसभा द्वितीय (२रा) स्थानावर राहिला (३५० बूथ, १००% कव्हरेज, ८,२०० श्रोते), तर वर्धा विधानसभा चौथ्या (४था) क्रमांकावर राहिला (३१२ बूथ, ९०% कव्हरेज, ७,६९१ श्रोते). तसेच देवळी विधानसभा १३व्या स्थानावर राहिला (१५२ बूथ, ४५% कव्हरेज, २,१७७ श्रोते). अशाप्रकारे राज्यातील पहिल्या चार क्रमांकांमध्ये वर्धा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणे, ही संपूर्ण भाजपसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली, असे जिल्हाध्यक्ष म्हणतात.

आमदार वानखडे म्हणतात

या यशानंतर आमदार सुमित वानखेडे यांनी आर्वी मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि बूथ स्तरावर अहोरात्र मेहनत घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले व अभिनंदन केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा विचार तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. आर्वी विधानसभेतील कार्यकर्त्यांची निष्ठा, समर्पण आणि शिस्तबद्ध नियोजनामुळेच आपण सलग पाचव्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावू शकलो. हा विजय आर्वीतील प्रत्येक बूथ कार्यकर्त्याचा आहे,” अशा शब्दांत आमदार सुमित वानखेडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.