वर्धा : एखाद्या गावाची ओळख ही तेथील खाद्य उत्पादनामुळे पण होत असते. जसे नागपूरची संत्री, जळगावची केळी. कोल्हापूरचे गोकुळ व विदर्भातील महानंदा दुधाचे यश गातात. तसेच ईथे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी पट्टा हा दुधाळ पट्टा म्हणुन परिचित राहीला. जंगली वन संपदा, चाऱ्याचे कुरण यामुळे आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात दुधाचे मोप उत्पादन होते. पण आता या भागाची नवी ओळख होवू घातली आहे. या दुधाच्या खोऱ्यात आता थंड पेयाचे आणि अन्य खाद्याचे उत्पादन होणार. तसा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विख्यात ‘वरुण बेव्हरेजेस’ सोबत झाला आहे. त्याचे कारण येथील आमदार सुमित वानखेडे.

आर्वी मतदारसंघात उद्योग येणार

महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि नामांकित ‘वरुण बेव्हरेजेस लिमिटेड’ यांच्यात नुकताच एक महत्त्वाचा सामंजस्य करार संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या करारामुळे वर्धा जिल्ह्यातील आर्वी एमआयडीसी क्षेत्रात तब्बल २,१०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक येत आहे. या ऐतिहासिक प्रकल्पाच्या माध्यमातून आर्वीचा चेहरामोहरा बदलणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगाराचे नवे दालन खुले होणार असल्याचे म्हटल्या जाते . या संपूर्ण प्रकल्पाच्या मागे आमदार सुमित वानखेडे यांचा सततचा व अत्यंत महत्त्वाचा पाठपुरावा राहिला आहे.

१२५ एकर जागा निश्चित

आर्वी एमआयडीसी परिसरातील १२५ एकर जागेवर हा अत्याधुनिक एकात्मिक अन्नप्रक्रिया व एफएमसीजी प्रकल्प उभा राहणार आहे. वरुण बेव्हरेजेसचा भारतातील हा सर्वात मोठा प्रकल्प असणार असून, याद्वारे पेप्सिकोच्या जागतिक दर्जाच्या शीतपेयांसह पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, फळांचे रस, स्नॅक्स, चिप्स, नूडल्स तसेच दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, दही, चीज, बटर आणि आईस्क्रीमची निर्मिती केली जाईल. या प्रकल्पातील उत्पादने केवळ देशांतर्गत बाजारपेठेतच नाही, तर जागतिक स्तरावर निर्यातीसाठीही पाठवली जाणार आहेत, ज्यामुळे आर्वीचे नाव जागतिक नकाशावर झळकणार आहे.

रोजगाराच्या विपुल संधी

स्थानिक पातळीवर युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचा दावा केल्या जात आहे. आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांमुळे या प्रकल्पातून ५५० हून अधिक प्रत्यक्ष तर एकूण ३,२०० हून अधिक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे केवळ कारखान्यापुरता रोजगार मिळणार नाही, तर परिसरातील शेतकरी, दूध उत्पादक, वाहतूकदार, पॅकेजिंग युनिट्स आणि विविध पुरवठादारांसाठी एक भक्कम औद्योगिक वातावरण तयार होणार आहे. स्थानिक स्तरावर फळे आणि दुधाच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्यामुळे शेतकरी व कृषी क्षेत्राला हक्काची बाजारपेठ मिळणार.

मुख्यमंत्र्यांचा लाभला पाठिंबा

आमदार सुमित वानखेडे यांच्या या दूरगामी व यशस्वी प्रयत्नांचे कौतुक होत आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात अंमलात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आला. उद्योग सचिव अनबलगन आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह यांच्यासह वरुण बेव्हरेजेसच्या व्यवस्थापनाचे आभार आमदार सुमित वानखेडे यांनी मानले आहेत. आता या उद्योग प्रकल्पाची सुरवात केव्हा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सर्वात अविकसित परिसर म्हणुन ओळख राहलेल्या आर्वी भागात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प व वैद्यकीय महाविद्यालय सूरू करण्याचे सुतोवाच झाले आहे. पाठोपाठ आता हा जागतिक बाजारपेठ देणारा उद्योग.