वर्धा : आर्वी नगर परिषद हद्दीतील मौजा सारंगपुरी येथील काही पाईप जमिनीतून काढून चोरी करून नेलेले आहे, असे नगरसेवक गुड्डू गावंडे यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी तक्रार केली. नगराध्यक्षा स्वाती प्रकाश गुल्हाने व सर्व नगरसेवक यांनी लगेच मुख्याधिकारी किरण सुकळवाड यांचेशी संपर्क करून परिस्थिती ची माहिती घेतली.
अखेर आली जाग
मुख्याधिकारी व प्रशासन यांना या विषयावर लगेच लक्ष देऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ठाणेदार सतीश डेहनकर यांना सोबत घेऊन लगेच घटनास्थळ गाठले. सारंगपुरी वरून आर्वी शहरात पाणी पुरवठा करणारी जुनी बंद झालेली पाईप लाईन मधील काही लोखंडाचे बीडाचे काही पाईप तेथून परस्पर खोदकाम करून जमिनीतून काढून कोणीतरी नेलेले आहेत, हे उघड झाले. नगराध्यक्षा गुल्हाने, उपाध्यक्ष गौरव जाजू,गटनेता संजय थोरात,पाणी पुरवठा सभापती अजय कटकमवार, नगरसेवक प्रशांत ठाकूर, लवेश गलोले, नगरसेविका सौ.उर्मिला पवार, माजी सभापती प्रकाश गुल्हाने व सामाजिक कार्यकर्ते यांनी तत्काळ पोलिस स्टेशन गाठले व पाईप चोरी प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. ठाणेदार सतीश डेहनकर यांनी लगेच या प्रकरणातील मुख्य आरोपी जीवन प्राधिकरणचे ठेकेदार शैलेश भुजाडे यास तत्काळ अटक केली.

अखेर सत्य बाहेर
आरोपी ठेकेदारास पोलिसी खाक्या दाखवला आणि सत्य बाहेर पडले. आर्थिक अडचणीत असल्यामुळे आरोपी शैलेश भुजाडे यानी सारंगपुरी येथील ९ फुटाचे लोखंडाचे १० पाईप विकले आहे असे कबूल केले. पाईप ची किंमत ४० हजार रूपये
नगराध्यक्षा म्हणतात की
सारंगपुरी चोरी प्रकरण समजताच लगेच पोलिस स्टेशन गाठले.पाणी पुरवठा अभियंता यांना तक्रार द्यायला लाऊन आम्ही गुन्हा दाखल करायला लावला. या प्रकरणात पोलिसांनी अतिशय चांगली कामगिरी करत लगेच सूत्र हलविली व ठेकेदार आरोपी शैलेश भुजाडे याला अटक केली आहे.
आर्वीचे पोलीस निरीक्षक
नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता यांचे तक्रारीवरून पाईप चोरी प्रकरणी बी एन एस कलम 303 चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे .आम्ही लगेच सूत्र हलवून आरोपी निष्पन्न करून आरोपी शैलेश भुजाडे याला अटक केली आहे.
