वर्धा : दुष्काळ जाहीर झालेला म्हणजे पाणी टंचाई अधिकृत मान्य. त्यातच ऑक्टोबर हिट ऐरणीवर. उन्हाची काहीली म्हणुन जीव तहानलेला. रुग्णालयात येणारा रुग्ण व त्याचे आप्त पाण्याच्या आणि सोबतच डॉक्टरच्या शोधात. पण पाणीही नाही आणि डॉक्टर पण नाही. शोधायला गेले तर डॉक्टर चक्क पाणी टँकरच्या देखरेखीत. नवलच नं!

जिल्ह्यात दुष्काळी झळ

वर्धा जिल्ह्यात ८ पैकी ७ तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहिर केला आहे. त्यात आष्टी तालुका आहे. पालक सचिव जिल्हा भेटीस आले तेव्हा त्यांना आष्टीत फारशी पाणी टंचाई नसल्याचे सांगण्यात आल्याचे कळले. पण आज विपरीत चित्र दिसून आले. आष्टीत ग्रामीण रुग्णालय आहे. येथे किमान १०० रुग्ण रोज दाखल होतात. पाण्यासाठी रुग्णालयाची बोअरवेल आहे. पण ती आताच आटली आणि रुग्णालयात बोंबाबोंब सूरू झाली. टंचाई भीषण याचा हा पुरावा. कारण यापूर्वी ही बोअरवेल कधीच आटली नव्हती. म्हणजे पुरेसे पाणी असायचे.

जिल्हा शल्यचिकित्सक भेटीस

आज एका माहिती संदर्भात जिल्हा चिकित्सक डॉ. राज सिंग यांना विचारणा करायची म्हणुन संपर्क केल्यावर ते म्हणाले आष्टीत आहे. कारण आष्टी ग्रामीण रुग्णालयाचा पाणी पुरवठा ठप्प पडला. बोअरवेल आटली. पर्याय म्हणुन टँकरने पाणी पुरवठा करण्याचा विचार सूरू आहे. शासकीय दराने टँकरचे पाणी घेऊन रुग्णालयातील टाकीत भरून ठेवावे लागणार. हे तातडीचे काम म्हणुन स्वतःच आलो.

अन्य रुग्णालये पण संकटात

आष्टीत रुग्णसेवेचे स्थळच तहानलेले. तर गावात पण समस्या आ वाचून उभी. विशेष म्हणजे इथले भाजप नेते पिक रब्बी संकटात म्हणुन धरणातील पाणी देण्याची मागणी करीत आहे. पाणी रुग्णास की शेतीस याचा हा तिढा. जिल्ह्यातील अन्य तालुके आणि तेथील शासकीय कार्यालये पण टंचाईस सामोरे जावू शकतात. समुद्रपूर व वडनेर येथील सरकारी रुग्णालये पाणी समस्या अनुभवणार. तसे संकेत हाती आले आहे.

टँकर पाणीपुरवठा अपरिहार्य

जिल्ह्यात आताच पाणी समस्या डोके वर काढू लागली आहे. टंचाई बैठकीत जानेवारीत पाणी समस्या उद्भवल्यास काय करायचे याची चर्चा झाली. पण आजच बोअरवेल, विहिरी, ओढे आटत चालल्याचे दिसून येते. आष्टी हा त्याचा पुरावा. हे लक्षात घेतल्यास प्रशासनास अधिक दक्ष राहण्याची व आपत्ती फेस करण्याची तयारी आतापासूनच करावी लागणार तर.