वर्धा : वर्धा जिल्ह्यात सेलू पट्टा हा केळी उत्पादक शेतकरी पट्टा म्हणून देशभर परिचित आहे. मात्र उष्णतेच्या झळा या केळी बागास करपून गेल्याची विदारक स्थिती आहे. त्याचे प्रत्यन्तर कवी अनिल यांच्या कवितेतून यावे.कवी अनिल म्हणजेच आत्माराम रावजी देशपांडे यांची ही कविता एक प्रसिद्ध अजरामर शोकांतिका ( Elegy ) मानली जाते. वर्धा मुक्कामी त्यांनी १९३८ साली ती लिहल्याचा संदर्भ मिळतो. ‘ केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी, कोमेजलि कवळी पाने, असुनी निगराणी ‘ असे पहिले कडवे काही व्यथा सांगून जातात. केवळ पाणी मिळाले नाही किंवा निगराणी झाली नाही म्हणून सुकली नाही तर दूर कुठे वणवा लागला आणि त्याची झळ पोहचली म्हणून ती सुकली, असा भावार्थ.
मे २०२६ मध्ये वर्धा जिल्ह्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेमुळे आणि अवकाळी वादळामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहेत. सतत अनेक दिवस पारा ४५ C ते ४७ C राहला. परिणामी हजारो एकर क्षेत्रातील केळीच्या बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘वर्धा जिल्हा केळी उत्पादक संघा’ने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रभावित केळी बागांचे तात्काळ विशेष पंचनामे करण्याची आणि विशेष आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
केळी हे उष्णतेला अत्यंत संवेदनशील पीक मानले जाते. तापमान वाढल्याने केळीच्या पानांचे करपणे, घडांच्या गुणवत्तेत घट होणे आणि फळांवर डाग पडणे यांसारख्या समस्या सुरू होतात. यावर्षी वर्ध्यात सलग अनेक दिवस तापमान ४५ वर राहिल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, मल्चिंग (आच्छादन), विंडब्रेक आणि सावली जाळी यांसारखे बचावात्मक उपाय करूनही या तीव्र उष्णतेपुढे ते अपुरे ठरले.
महावितरणचा फटका आहेच
अनेक गावांमधील केळीच्या बागा पूर्णपणे करपून गेल्या असून, झाडांची वाढ खुंटली आहे आणि काही ठिकाणी तर संपूर्ण झाडे सुकण्याच्या अवस्थेत आहेत. या नैसर्गिक आपत्तीत महावितरणच्या विस्कळीत कारभारामुळे आणखी भर पडली आहे. नुकत्याच झालेल्या वादळामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील वीज वितरण यंत्रणा कोलमडली असून, ४ ते ५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित किंवा अत्यंत अनियमित आहे. केळी हे पूर्णपणे सिंचनावर अवलंबून असलेले पीक असल्याने, या कडक उन्हात पाणी न मिळाल्यामुळे पिकाचे नुकसान दुप्पट झाले आहे.
केळीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. सध्या एकरी सुमारे २.५० ते ३.५० लाख रुपये खर्च येत असून, यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी बँका व पतसंस्थांकडून मोठी कर्जे काढली आहेत. बागाच उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर मुद्दल तर सोडाच, पण पुढील उदरनिर्वाहाचा आणि कर्जफेडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून ते गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत.
केळी उत्पादक संघाच्या मागण्या
केळी उत्पादक संघाने सामूहिक निवेदनाद्वारे शासनाकडे खालील मागण्या केल्या. प्रभावित केळी बागांचे तात्काळ विशेष पंचनामे करून, या अभूतपूर्व उष्णतेला ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून मान्यता द्यावी आणि शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत मंजूर करावी. पीकविमा योजनेचा लाभ तातडीने मिळावा, तसेच शेतकऱ्यांच्या कर्जाच्या हप्त्यांना मुदतवाढ देऊन व्याज सवलत देण्यात यावी. थकीत कर्जदारांची वीज जोडणी तोडू नये आणि व्याज व दंड माफ करावा. उन्हाळ्याच्या काळात आणि विशेषतः ‘रेड अलर्ट’च्या परिस्थितीत महावितरणने कृषी फीडरवर अतिरिक्त तास वीज देऊन कृषी पंपांना अखंडित व पुरेसा वीजपुरवठा करावा.केळी बागांच्या पुनरुज्जीवनासाठी लागणारी खते, औषधे आणि इतर निविष्ठांवर विशेष अनुदान किंवा सवलत देऊन शासनाने विशेष मोहीम राबवावी.
जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांचे भवितव्य आता शासनाच्या निर्णयावर अवलंबून असून, जिल्हा प्रशासनाने यावर तात्काळ सकारात्मक पाऊल उचलावे, अशी आर्त हाक केळी उत्पादकांनी दिली आहे.अन्यथा कवी अनिल यांचा आर्त स्वर कायम राहणार, असे मत केळी उत्पादक संघाची भूमिका मांडणारे डॉ. सचिन पावडे व्यक्त करतात.
