वर्धा : उमरेड येथून आलेला वाघ आपल्या डरकाळ्यांनी शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन जगण्यास भाग पाडत आहे. त्यास जेरबंद करण्याचे निर्देश वन मंत्र्यांनी दिले. पण भय संपता संपत नाही. आता जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकावर कारंजा तालुक्यात अस्वल हल्ले करीत असल्याच्या घटना पुढे येत आहे.

कारंजा तालुक्यातील नरसिंगपूर येथील पशुपालक शेतकरी गोमाजी मानकर ६५ हे अस्वलाच्या हल्ल्यात बळी गेले. ते स्वतःची जनावरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. तेव्हा एका अस्वलीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मानकर यांनी सोबत नेलेली जनावरे रात्री घरी परतली. पण ते घरी नं आल्याने त्यांचा शोध सुरू झाला. रात्री त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. शनिवारी सकाळ पासून सुरू असलेल्या पावसात त्यांचा परत शोध सुरू झाला. शेवटी त्यांचा मृतदेहच आढळला.

हेही वाचा…एका कुटुंबाची दुर्देवी कहाणी, वडील हृदयविकाराने गेले, आईचा अपघाती मृत्यू, आता मुलीची आत्महत्या…

अस्वलीच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे वन कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. गावापासून जंगलात पाच किलोमीटर आत मध्ये मृतदेह सापडला. तिथे वाहन जाऊ शकत नसल्याने गावकरी व वन कर्मचारी यांनी मृतदेह हाती घेत गावात आणला. कारंजा पोलीस ठाण्याचे महेश भोरटेकर, लीलाधर उकंडे, खुशाल चाफले यांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. वन अधिकारी गजानन बोबडे व विजय सूर्यवंशी यांनी पुढील कारवाई केली. कारंजा परिसरात वाघ, बिबट आहेच. पण प्रामुख्याने अस्वलीचा वावर अधिक असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा…नागपुरात डेंग्यू, चिकनगुनियाचे थैमान…. ४ हजार ५५७ दूषित भांडी….

दुसरीकडे समुद्रपूर भागात काही दिवसापासून भीती निर्माण करणाऱ्या वाघास पकडणे सततच्या पावसाने कठीण कार्य झाले आहे. उमरेड येथील जंगलातून आलेला हा वाघ समुद्रपूर येथील झूडपी जंगलात दोन दिवसापूर्वी दिसला. त्या आधी पोथरा धरण क्षेत्रात त्याने हैदोस घालत सहा जनावरांचा बळी घेतला होता. खरीप हंगामाची कामे सुरू असताना वाघाचा मुक्त वावर शेतकऱ्यांसाठी भितीदायी ठरत आहे. म्हणून वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आमदार समीर कुणावार यांनी वाघास त्वरित पकडण्यासाठी उपाय करण्याची विनंती केली. मग तसे निर्देश जिल्हा वन अधिकारी यांना देण्यात आले. चार जीप्सी गाड्या तसेच पायदळ गस्त घालीत वाघ शोधल्या जात आहे. वाघ, अस्वल, बिबट यांची पावसामुळे भटकंती वाढत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येते का? समुद्रपूर भागात मुक्तसंचार करणारा वाघ जेरबंद होतो का, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.