वर्धा: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह देशभरातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशात ‘ एसआयआर ‘ म्हणजेच special Intense Rivision मोहीम सुरू केली आहे. या विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेत मतदारयादी बाबत कामे केल्या जात आहेत. गतवर्षी बिहार विधानसभा निवडणुकीत ही प्रक्रिया चांगलीच गाजली होती. मात्र या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक अचूक केली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. कोणतीही पात्र व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये आणि यादी अचूक व्हावी, असा हेतू सांगितला जातो.

घरोघरी भेट

हे काम प्रामुख्याने शिक्षक वर्ग करीत आहे. त्यांना Booth Level Officer म्हणजेच बीएलओ असे संबोधल्या जाते. ते मतदार घरी प्रत्यक्ष भेट देत माहितीची शहानिशा करतात. ही माहिती नवीन नोंदणी – अर्ज ६, वगळणी – अर्ज ७ व दुरुस्ती – अर्ज नमुना क्र. ८ या आधारे भरल्या जाते. १८ वर्ष पूर्ण झालेले तसेच नाव, पत्ता, वयातील चुका दुरुस्त करणे आणि मयत व्यक्तींची नावे किंवा दुबार नोंदणी असलेली नावे काढून टाकणे अशी प्रक्रिया होत आहे. ही कामे करतांना या केंद्र अधिकाऱ्यांना विविध अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याचा जाहीर उद्रेक आज झाला

नेमक्या अडचणी कोणत्या?

अनेक शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना काम नं स्वीकारल्यास सेवेतून बडतर्फ करण्याची तंबी दिल्या जात आहे. त्यांची व्यक्तिगत अडचण समजून घेतल्या जात नाही. काम करतांना त्रास होतो. यापैकी २७६ व २६८ या क्रमांकाच्या मतदार अधीकाऱ्यास माहिती विचारली म्हणून धमकी देण्यात आली. ७ एप्रिल रोजी २६९ क्रमांकाच्या अधिकाऱ्यांस लूटमार करीत १३०० रुपये हिसकावून घेण्यात आले. शिवीगाळ नेहमीचीच. हे मतदार यादीचे काम करतांना एकावर कुत्रा सोडण्यात आला. एका घरी हा अनुभव २३३ क्रमांकाच्या शिक्षक मतदार अधीकाऱ्यास आला. हे असा अनुभव घेणारे BLO आता बोलायची सोय नाही म्हणून शिक्षक संघटनेकडे गेले.

संघटनेची अपेक्षा

हे काम एक कर्तव्य म्हणून स्वीकारले. पण सुरक्षेचे काय, असा सवाल प्रहार या शिक्षक संघटनेने केला. शिबीर आयोजन करीत मार्गदर्शन करावे. मतदार जागृती पहिले झाली पाहिजे. अन्यथा शिक्षक SIR च्या कामात प्रशासनाला सहकार्य करणार नाही असा ईशारा प्रहार शिक्षक संघटनेचे नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांनी दिला. त्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना आज अडचणी सांगण्यात आल्या. मतदार यादीचा विशेष सखोल पुनॅनिरीक्षण कार्यक्रमा ( SIR) अंतर्गत मोठ्या प्रमाणात शिक्षक /कर्मचाऱ्यांची मतदार केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये काही शिक्षक/ कर्मचाऱ्यांच्या अडचणी असताना त्यांच्या अडचणी लक्षात न घेता BLO चे काम न स्वीकारल्यास दडपशाहीचा वापर करून सर्व शिक्षक/ कर्मच्याऱ्यांना BLO चे काम स्वीकारण्यास बाद्य केले. त्यामध्ये बरेच शिक्षक /कर्मचारी मानसिक तणावात काम करीत आहेत. मुळात बोर्ड परीक्षा, शालेय परीक्षा, पेपर्स तपासणे, विद्यार्थ्यांचा निकाल तयार करणे व त्यात SIR चे काम, त्यामुळे शिक्षक/कर्मचारी पुर्णतः गोंधळून गेलेला आहे. फोनवर पत्नीची माहिती विचारल्यास मतदार पती धमकावतो. केव्हा यायचे हे विचारल्यास शिवीगाळ केल्या जाते. असे प्रकार त्रस्त करणारे ठरत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे .त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बी एल ओ यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होऊन BLO म्हणून काम करण्याची मानसिकता नाही त्यामुळे त्यांना सुरक्षितता प्रदान करावी अशी मागणी करण्यात आली.

प्रक्रिया क्लिष्ट

मतदारांची २००२ च्या मतदार यादीत मॅपिंग करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असून मतदारांकडून पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. मुळामध्ये २००२ च्या यादीमधील आई-वडील किंवा स्वतःचे नाव मॅपिंग करण्याची प्रक्रिया मतदारांकडून करून घेणे अपेक्षित आहे .परंतु तसे न करता BLO नी मतदारांकडे जाऊन ही माहिती जमा करून मॅपिंग करण्याची जबाबदारी सोपविण्पात आलेली आहे .त्यामुळे मतदारांना आवाहन करून मतदान बूथ वर जाऊन मॅपिंग करून घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणे अपेक्षित आहे. पण पूर्णतः बी एल ओ वर ही जबाबदारी सोपविणे न्यायसंगत नाही.असे आज नमूद करण्यात आले.नियुक्त बीएलओंना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करून द्यावे, त्यांच्या जीविताची हमी घ्यावी ,तसेच BLO म्हणुन नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात येऊ नये.नियुक्त BLO शिक्षक/ कर्मच्याय्रांना दारोदारी भटकून माहिती गोळा करून मनस्ताप देण्यापेक्षा याबाबत जागृती करून कॅम्पचे आयोजन करून मतदारांनी BLO कडे जाऊन मॅपिंग करून घ्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.निवेदनात नमूद मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास नियुक्त BLO सदर कामात प्रशासनाला सहकार्य करणार नाही असा इशारा देण्यात आला.

हे शासकीय व जबाबदारीचे काम म्हणून विरोध जाहीर करायची सोय नाही. तोंड दाबून बुक्क्याचा मार, अशी स्थिती पाहून शेवटी शिक्षक संघटना पूढे आली. प्रहार शिक्षक संघटनेचे कुंडलिक राठोड, धनराज कावटे, पुरुषोत्तम शेकार, अजय सावरकर, अमोल वाशिमकर, नितिन वाघ, रहीम शहा, प्रवीण वास्कर,संतोष महाजन, अविनाश धात्रक, मोहम्मद आरीफ, कीशोर ढेंगरे, निलेश महल्ले, गजानन कोरडे, सिद्धार्थ वाणी, प्रदीप भट, जगताप, कुबडे संध्या करमणकर, संजय घोडखांदेसह मोठ्या संख्येत शिक्षकांनी हजेरी लावत आज संताप व्यक्त केला.