वर्धा : अभयारण्य म्हटले की नाना पक्षी, प्राणी प्रजाती ओघाने आलेच. बोर अभयारण्य तर त्यासाठी सर्वत्र विख्यात. किर्रर्र किड्यांचा आवाज आणि वाघाची डरकाळी. पक्ष्यांचा किलबिलाट आणि माकडांचे हुप्प हुप्प एकाचवेळी ईथे तुम्ही ऐकाल. यात राष्ट्रीय पक्षी म्हणुन जंगलभर तोरा मिरविणारा मोर. एकवेळ वाघ दिसणार नाही पण मोरांचा थवा हे इथले वैभव. हमखास दिसणार. त्याचे नर्तन, पंखाचा पिसारा, केकाटने, झाडावर उड्या मारणे, हळुवार झेपावने, सगळं काही अद्भुत.

मोराचे अदभूत दर्शन

बोर प्रकल्पात पर्यटकसाठी ३ द्वारे आहेत. बोर मुख्य आणि ढगा व राहटी अश्या ३ मार्गातून तुम्ही बोरचे वन वैभव न्याहाळू शकता. वाघ दिसेल ही खात्री ठेवून मात्र जावू नका. संख्येने ते पण विपुल. पण प्राणी संग्रहालयाप्रमाणे हमखास दिसेल असे निश्चित नाही. पण अस्वल, मोर, काळविट, हरीण, लांडगे, माकडांची झुंड, रानटी कुत्रे, बिबट, हे भेटीस येतील. आता हेच बघा. राष्ट्रीय पक्षी म्हणुन आब राखून असणारा मोर ईथे विलोभनीय स्वरूपात टिपल्या गेलाय. हा व्हीडिओ तर मोराचे असे देवदुर्लभ दर्शन घडवितो.

एक एक विभ्रम

मोर आणि त्याचे साथीदार मुक्त संचार करीत असल्याचे यात दिसून येते. १ मिनिट २० सेकंदच्या या व्हीडिओत मोराच्या १०० वर अदा दिसून येतात. पिसारा फुलविणे, तो एकत्र करणे सगळे चकित करून जाते. पुर्ण वाढ झालेला हा मोर. त्यामुळे पिसांची संख्या मोजता पण येत नाही. समोर व मागून ही पिसे बघायला मिळतात. त्याचा केकाट शांत जंगलास भेदून प्रकटतो. मी राष्ट्रीय पक्षी कां ? याचे उत्तर या अश्या दर्शनातून मोर घडवितो. अफलातून, असेच म्हणावे लागेल अशी टिपणी वन क्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर करतात. हे इथले वैभव. इथले प्राणीच आपली व बोरची महती गातात. सध्या पर्यटकांचा काळ. त्यामुळे असे दर्शन घडले तर पर्यटक खुश होत परततात.

राहटी प्रवेशद्वार

मोराचा हा अनोखा विभ्रम राहटी गेटवर टिपल्या गेला आहे. सध्या हा परिसर विराट या धिप्पाड वाघाच्या वास्तव्याने चर्चेत आला आहे. त्याचे अस्तित्व अन्य प्राण्यांना दबा धरून बसण्यास भाग पाडते. पण त्यातही मोर मात्र थव्याने दिसतातच. पिंकी वाघीण पण तिच्या बछड्यासह भ्रमंती करीत असल्याचे अनेकांनी पाहले आहे. पण संपूर्ण बहरात आलेल्या मोराचा असा पिसारा आणि आवाज भुरळ घालत आहे.