वर्धा: रंगबिरंगी फुलपाखरू कोणास मोहात नाही पाडत, हे विचारू नका. अनेकांचे बालपण हे फुलपाखरामागे हुंदडण्यात गेले आहे. इवलासा जीव हातावर घेत त्यास लळा लावण्याची बाब मोहकच. पण इवलासा म्हटला जाणारा जीव सतत स्थलांतर करीत असतो. पार समुद्र लंघन करण्याची किमया ते करीत असल्याचे सिद्ध झाले आहे.
फुलपाखरू मुक्काम ठिकाणे
फुकपाखरू प्रामुख्याने फुलं, मकरंद व बागांमध्ये आढळून येते. पण चक्क शेणात, मातीच्या ढीगाऱ्यावर जर हे पाखरू दिसून येत असेल तर नवलच. सुगंधी फुलावर बसणारं हे पाखरू जर घाणीत दिसत असेल तर तुम्हा- आम्हास आश्चर्यच वाटणार. पण नाहक शंका घेऊ नका. कारण ते आपल्यापेक्षा आहाराबाबत अधिक दक्ष असल्याचे एका संशोधनातून पूढे आले आहे.
अन्नाची शोधमोहीम
शेणावर किंवा दलदलीवर फुलपाखरांचा मोठा समूह दिसल्यास ते पक्ष्यांप्रमाणे केवळ एकाच अन्नाच्या शोधात एकत्र आले आहेत असे नाही. एखाद्या विशिष्ट ठिकाणी असलेला ओलावा आणि पोषक घटकांचे (Nutrients) प्रमाण अनेक फुलपाखरांना आकर्षित करते. संशोधनानुसार फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजातींची ओल्या जागेवरून (Puddling substrate) द्रव शोषून घेण्याची पसंती वेगवेगळी असते. यामध्ये सोडियमचे (मीठ/खनिज) प्रमाण हा एक महत्त्वाचा घटक असतो.
तापमानाचा प्रभाव
या प्रक्रियेवर तापमानाचाही परिणाम होतो. भारतातील ‘कॉमन मॉर्मन’ (Papilio polytes) या फुलपाखरावर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, त्यांच्या द्रव शोषण्याच्या (Puddling) हालचालींवर तापमानाचा मोठा प्रभाव पडतो. म्हणुन फुलपाखरांचे भिरभिरणे ही एक हेतूपुरस्सर होणारी हालचाल समजावी.
डॉ. आशीष टिपले म्हणतात.
फुलपाखरू व पतंग याचा गाढा अभ्यास असलेले म्हणुन येथील प्रा. डॉ. आशीष टिपले यांचा परिचय दिल्या जातो. त्यांचे अनेक शोध प्रबंध या विषयावर प्रसिद्ध झाले आहे. ते म्हणतात की फुलपाखरांचे हे वर्तन “puddling” (पडलिंग) म्हणून ओळखले जाते. प्रौढ फुलपाखरे चिखल, ओलसर माती, प्राण्यांचे मलमूत्र, कुजलेले पदार्थ किंवा कधीकधी मृत प्राण्यांमधून द्रव स्वरूपातील सोडियम, नायट्रोजन, अमिनो आम्ले आणि इतर खनिजे मिळवतात.
प्रामुख्याने शेणावर दिसतात
विशेषतः शाकाहारी प्राण्यांच्या शेणावर फुलपाखरे आढळू शकतात. भारतातील पश्चिम घाटात हत्तीच्या शेणावर २६ प्रजातींची १०७ फुलपाखरे puddling करताना नोंदवली गेली आहेत. अभ्यासानुसार शेणातून खनिजांचे पूरक स्रोत मिळू शकतात.“शेण हे फुलपाखरांचे मुख्य अन्न नाही; ते त्यांच्या आहारातील कमतरता भरून काढण्यासाठीचे पूरक पोषणस्रोत आहे.”
फुलपाखरांना फुलांमधून मुख्यतः ऊर्जा मिळते, तर puddling मधून मिळणारे सोडियम व नायट्रोजनसारखे घटक शरीरक्रिया आणि प्रजननासाठी महत्त्वाचे असू शकतात. काही अभ्यासांमध्ये नायट्रोजनचा वापर प्रथिने व शुक्राणू निर्मितीसाठी होत असल्याचेही दिसून आले आहे.“फुलपाखरे शेणावर puddling करतात, कारण शेणामध्ये त्यांना त्यांच्या नेहमीच्या nectar-based आहारातून कमी मिळणारे सोडियम, नायट्रोजन, अमिनो आम्ले व इतर खनिजांचे पूरक स्रोत उपलब्ध होतात.” असे डॉ. टिपले यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.
