चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयाची कसोटी लागल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांच्या प्रचारात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी सक्रियपणे सहभागी होत असले, तरी या पक्षांशी संबंधित नगरसेवक मतदार मोठ्या प्रमाणात भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेस नगरसेवक पर्यटनाला

१८ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपच्या एका प्रभावशाली स्थानिक लोकप्रतिनिधीने काँग्रेससह महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांच्या नगरसेवकांना राज्याबाहेरील पर्यटनस्थळी रवाना केल्याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर मतदारांच्या हालचाली आणि त्यांच्या निष्ठांबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मतदारांना एकत्र ठेवण्याचे महाविकास आघाडी समोर आव्हान

निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राहिलेले आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत होते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील काही राजकीय गटांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याची चर्चा होती. मात्र अखेरीस काँग्रेसने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, सावली, जिवती, कोरपना, चिमूर आणि भिसी या भागांतील काँग्रेसचे अनेक नगरसेवक सध्या पक्षाच्या मुख्य प्रचार यंत्रणेपासून दूर असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे काही नगरसेवकही पक्षीय हालचालींपासून दूर असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीसमोर आपले मतदार एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

लोकप्रतिनिधी प्रचारात, मतदार भाजपच्या संपर्कात

स्थानिक पातळीवर काँग्रेसचे खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकारी शैलेश अग्रवाल यांच्या प्रचारात सक्रिय असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्ष मतदान करणारे नगरसेवक कितपत एकजूट राहतील, हा सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे. या मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ४५० नगरसेवक मतदार आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे २२१, भाजपचे १३६, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे २३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ७ तसेच इतर पक्ष व अपक्ष मिळून ३७ नगरसेवकांचा समावेश आहे. संख्याबळाच्या दृष्टीने काँग्रेस आघाडीवर असली, तरी मतदारांच्या संभाव्य हालचालींमुळे निवडणुकीचे गणित अधिक गुंतागुंतीचे बनल्याचे मानले जात आहे.

काँग्रेस नगरसेवकांच्या भूमिकेबाबत अनिश्चिततेचे वातावरण

दरम्यान, भाजपचे उमेदवार अरुण लखानी यांनी विविध स्तरांवर प्रभावी संपर्क मोहीम राबविल्याची चर्चा असून, त्याचा निवडणुकीवर कितपत परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील पदाधिकारी प्रचारात एकदिलाने काम करत असताना नगरसेवक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान कायम आहे.

सध्या तरी या निवडणुकीत एक वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. पक्षांचे पदाधिकारी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय दिसत असताना, नगरसेवक मतदारांच्या भूमिकेबाबत मात्र अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे अंतिम निकालापर्यंत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आमचे काही नगरसेवक गोवा येथे पर्यटनाला गेले आहेत. त्यातील काही नगरसेवकांशी संपर्क केला असता ते परत येण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांना परत आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. – राजेंद्र वैद्य, ग्रामीण जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)