वर्धा : सध्या विधान परिषदेची निवडणूक उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चांगलीच चर्चेत आली आहे. काँग्रेस व भाजपने उमेदवार जाहीर करताच थोडी पक्षातर्गत खळखळ उडाली. पण अर्ज दाखल झालेच.
वर्धा चंद्रपूर स्थानिक स्वराज मतदारसंघात भाजपने उद्योगपती अरुण लखानी यांना उमेदवारी दिली. आणि हे कोण असा प्रश्न खुद्द भाजपचे नगरसेवक विचारते झाले. पण ही धामधूम असतांनाच एक बडे लग्न पण याच काळात होवू घातले आहे.
हे तर आमचे ‘नवरदेव’
भाजपचे वर्धा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांना उमेदवारीवरून नाराजी आहे कां, अशी विचारणा केली. तेव्हा ते म्हणतात की लखानी यांना पक्षाने त्यांची निष्ठा पाहून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराजी हा मुद्दाच नाही. ते तर आमचे नवरदेव. त्यामुळे आम्हीच सर्व ते काम करणार. भाजपमध्ये उमेदवार दिला की इतरांनी आपले काम करावे, असा दंडक. असे जिल्हाध्यक्ष स्पष्ट करतात.
पवारांशी सोयरीक म्हणून चर्चा ?
अरुण लखानी हे खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही होणार. म्हणजे लखानी यांचा मुलगा सारंग लखानी यांच्याशी सुप्रिया सुळे यांच्या मुलीचा साखरपुडा झाला असून लवकरच लग्न होणार आहे. आता विधान परिषदेचे आमदार ( MLC ) होवू इच्छिणाऱ्या लखानी यांना हे पण एक कर्तव्य आहेच. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. पवार कुटुंबाशी सोयरीक ही त्यांची आताची ओळख. पण लखानी कुटुंब दोन पिढ्यापासून संघाचे समर्थक आहेत. विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. सुप्रिया सुळे यांच्या कन्येचेच नव्हे तर लखानी पुत्राचे पण हे लग्न आहे, हे विसरू नये, असे एका भाजप आमदाराने स्पष्ट करीत ज्याप्रमाणे सुळे परिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विवाह निमंत्रण देऊन आला तसेच लखानी हे सुद्धा मोदी यांना भेटून निमंत्रण देऊन आलेत, असे निदर्शनास आणले.
निवडणूक आणि लग्न मुहूर्त
विधान परिषदेचा निवडणूक कार्यक्रम २५ मे पासून सूरू झाला. १८ जूनला मतदान व २२ जूनला मतमोजणी आहे. १८ जूनला मतदान आटोपते आणि २० जून रोजी लखानी – सुळे विवाह सोहळा मुंबईत आहे. पुढे दिल्ली व नागपुरात स्वागत समारंभ. म्हणजेच दोन दिवस लखानी यांना कार्य आहे. पण त्यामुळे काही अडचण नाही. कारण निवडणूक पक्षीय यंत्रणा सांभाळणार तर विवाह जबाबदारी कुटुंबाकडे. आधी लगीन कोणाचे, हा मुद्दाच नसल्याचे एका भाजप पदाधिकाऱ्याने नमूद केले.
