वर्धा : शहरातील नागरिकांच्या महत्वाच्या अपेक्षा असतात त्या स्वच्छता, कोंडी विरहित वाहतूक, बेवारस जनावरांचा बंदोबस्त व अन्य. त्यात प्रामुख्याने सुरळीत व सुरक्षित वाहतूक ही बाब अधिक सोयीची ठरावी, अशी अपेक्षा. मात्र वर्धेकर लक्ष ठेवून होते ते हिंगणघाट, यवतमाळ, बाजार समिती, वायगाव व अन्य लगतच्या गावांना वाहतूक असणाऱ्या पुलाची. तो रखडतच चालला होता. शेवटी पूर्ण झाल्यानंतर तो प्रथमच उजळला आहे. आणि या लख्ख प्रकाशात नागरिक न्हावून निघाले.
वर्धा शहरास जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाची मागणी जोरात सूरू झाल्यावर तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांनी त्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याचे आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल असे नामकरण त्यावेळच्या काँग्रेस राजवटीत झाले. पण खरी चालना मिळाली ती भाजप सत्ताधारी असतांना. शेवटी २०२५ मध्ये काम पूर्णतःवास गेले.
या काळातील खासदार रामदास तडस यांनी रेल्वे मंत्री व प्रामुख्याने नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करीत काम मार्गी लावले. गर्डरची अडचण बरीच वेळ राहली. नव्याने खासदार झालेले अमर काळे यांनी ही बाब हाती घेतली. पण श्रेय कुणाचे हा वाद उद्भवला. त्यावेळी आमदार असलेल्या डॉ. पंकज राजेश भोयर यांनी पण पुलावर आंदोलन केले होते. पण पुलावरील वाहतूक मात्र काही केल्या सूरू होत नव्हती. कारण अधिकृत लोकार्पण झाले नव्हते. केंद्रीय मंत्रालय म्हणून अधिकृत प्रथम अधिकार स्थानिक खासदार अमर काळे यांचा.
पण भाजप केंद्रात व राज्यात सत्तेवर असतांना काँग्रेस आघाडीचा खासदार कसे श्रेय घेणार, असा तिढा पुढे आला. पण घडामोड झाली. शहर जोडणाऱ्या या पुलावरून सावंगी येथील मेघे विद्यापीठाची गणेश विसर्जन मिरवणूक निघाली. लोकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी होत्याच. त्याची दखल झाली. या मिरवणूकीत दत्ता मेघे यांनी लोकाग्रहास्तव पुलावर नारळ फोडत पूल वाहतुकीचा शुभारंभ करून टाकला. ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली त्यांनाच श्रेय आपसूक मिळाले.
वाहतूक सूरू झाली पण पुलावर अंधाराचे साम्राज्य. त्यामुळे उपद्रवी लोकांचा उच्छाद वाढला. महिला, मुली यांना छेडण्याचे, अडविण्याचे प्रकार सूरू झाले. त्या तक्रारी खा. काळे यांच्याकडे पोहचल्या. त्याची त्वरित दखल घेत त्यांनी पुलावरील पथदिवे लवकर सूरू करण्याची सूचना बांधकाम विभागास केली. पत्र गेली पण दखल नाही म्हणून फोनवरून तंबी दिली. तीन दिवसात पथदिवे सूरू करीत होणारा उपद्रव थांबवा अन्यथा… हा ईशारा अखेर कामात आला.पहिल्याच दिवशी उड्डाण पूल प्रकाशमान झाला. महिला, मुली, वृद्ध यासह सर्व आनंदित झाले. खासदार काळे म्हणतात हा श्रेयवादाचा प्रश्न नाही. पण समस्या समोर आली आणि त्याची दखल घेण्यात आली, हे महत्वाचे. मी बांधकाम विभागास धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या सूचनेवर त्वरित अंमल केला.
