वर्धा : सध्या SIR म्हणजेच विशेष सखोल पुर्णनिरीक्षणची धामधूम सूरू आहे. यात अनेक बाबी नागरिकांना शंकेत पाडणाऱ्या असल्याची ओरड पण होते. म्हणून वर्धा जिल्हा प्रशासनाने एक सुविधा या अनुषंगाने उपलब्ध करून दिली असून ती राज्यात एकमेव अशी सोय असल्याचा दावा केला जातोय. केवळ एसआयआर पुरतेच हे मर्यादित राहणार नसून सर्व सार्वत्रिक निवडणुकीबाबत हे माध्यम उपयुक्त ठरणार.
SIR आणि निवडणुका
विशेष सखोल निरीक्षण हे कसे होत आहे, त्यासाठी कोणते अर्ज सादर करावे लागतात, कुठली माहिती कुठे व कशी उपलब्ध होणार, अर्ज भरतांना काय खबरदारी घ्यायची, अर्ज संबंधित चौकशी कुठे, मतदार यादी, नाव वागळणे, नवे नाव टाकणे व अन्य बाबी स्पष्ट केल्या जाणार आहेत. निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अतुल रासपायले यांनी नमूद केले की हे वॉट्सअप चॅनल विशेष राहणार. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या सूचनेने व मार्गदर्शनात हे सूरू करण्यात आले आहे. कोणताही नागरिक याचा लाभ घेऊन स्वतःस अपडेट ठेवू शकतो.
निवडणुका आणि मतदार
जिल्हा प्रशासनाने मतदारांना सुलभतेने माहिती देण्यासाठी आणि लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. निवडणूक विभागाने वर्धा जिल्ह्यासाठी अधिकृत ‘Election Section (General Election) Wardha’ हे व्हॉट्सॲप चॅनेल (WhatsApp Channel) सुरू केले असून, याद्वारे नागरिकांना निवडणूक प्रक्रियेची सर्व अधिकृत माहिती थेट त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे.
माहितीचा विश्वसनीय स्रोत राहील. सोशल मीडियाच्या युगात अफवा आणि चुकीच्या बातम्या वेगाने पसरतात. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्हॉट्सॲप चॅनेलवर मतदारांसाठी मार्गदर्शक सूचना, मतदानाची तारीख, वेळ, मतदान केंद्रांवरील सोयी-सुविधा, आणि आचारसंहितेचे नियम याविषयीची इत्यंभूत माहिती नियमितपणे पोस्ट केली जाणार आहे. तसेच, उमेदवारांचे अर्ज, छाननी आणि निवडणूक निकालांचे थेट अपडेट्सही या चॅनेलवर उपलब्ध असतील. नागरिकांना चॅनेलशी जोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांना, तरुण मतदारांना आणि समाजमाध्यम वापरकर्त्यांना या अधिकृत चॅनेलला फॉलो करण्याचे आवाहन केले आहे.
अन्य स्रोताची गरज नाही
या चॅनेलमुळे मतदारांना कोणत्याही तिसऱ्या स्रोतावर अवलंबून न राहता थेट प्रशासनाकडून प्रमाणित माहिती मिळेल. चॅनेलला जॉईन असे करता येईल. नागरिक खालील अधिकृत लिंकवर क्लिक करून थेट या व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सामील होऊ शकतात. Election Section Wardha WhatsApp चॅनेल लिंक ओपन केल्यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या Follow’ बटणावर क्लिक करावे, जेणेकरून सर्व अपडेट्स नियमित मिळत राहतील.
मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी उपक्रम
वर्धा जिल्हा प्रशासनातर्फे ‘स्वीप’ (SVEEP) उपक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. हे व्हॉट्सॲप चॅनेल याच मोहिमेचा एक भाग आहे. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत, विशेषतः नवमतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रशासनाचा मानस आहे. ‘भयमुक्त आणि पारदर्शक’ वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घेऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन वर्धा जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
