वर्धा, संपत्ती व संताप यात अडकलेला कोणीही काय करेल याचा नेम नाही. प्रसंग आनंदाचा असला तरी त्याची चिंता नं करता टोकाचे पाऊल उचलण्यापर्यंत मजल जावू शकते. एकीकडे सर्व वऱ्हाडी बँड बाजा बारात यात धूम करीत होते. तर त्याचवेळी एकाच्या डोक्यात शिगोशिग संताप उसळ्या मारत होता. अखेर नको तेच झाले. दोघांचा हकनाक जीव गेला.

घटना अशी

हे दुहेरी हत्याकांड वर्धा शहरात शनिवारी रात्री घडले. त्यात प्रभाकर भलमे व त्यांचा मुलगा नितीन भलमे यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी हा अल्पवयीन पुतण्याच आहे. त्यास वर्धा पोलिसांनी अटक केली. याच कुटुंबातील एकाचे शनिवारी रात्री लग्न होते. त्यासाठी नवरदेव व अन्य वऱ्हाडी मंडळी मारोती मंदिरात पोहचली. महिला आश्रम समोरील मारोती मंदिरात सर्व दर्शन घेऊन परत जात होते. त्याचवेळी ही घटना घडली. आरोपी मुलाने त्याचे काका व चुलत भाऊ असलेल्या युवकावार चाकूने वार करणे सूरू केले. सपासप वार करण्यात आल्याने रक्ताचा सडाच पडला. पण लगेच या दोघांना जखमी अवस्थेत सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार पण सूरू झाले. मात्र उपचारा दरम्यान प्रभाकर भलमे व नितीन भलमे यांची प्राणज्योत मावळली.

खुनाचे कारण

दोन जीवांचा या घटनेत अंत झाला आहे. तो पण पुतण्यानेच केला. हा परिवार वर्धेलगत बरबडी या खेडे गावातील आहे. आरोपी व मृतक हे याच गावात शेती करतात. त्यांच्यात अनेक दिवसापासून खटके उडत होते. भांडणे पण झाली. संपत्तीच्या वादातून हे प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. ८ महिन्यापूर्वी पण अल्पवयीन आरोपी मुलगा व मृत काका यांच्यात चांगलाच वाद झाला होता. तो राग डोक्यात ठेवूनच आरोपी वावरात होता. तो काकास मारण्याच्या बेतात अनेक दिवसापासून असल्याची चर्चा होत होती. अखेर त्याने लग्नाचा प्रसंग साधलाच. या दिवशी काका व चुलत भाऊ येणारच, अशी त्याची खात्री होती.

ऑनलाईन चाकू बोलावला.

शनिवारी वर्ध्यात होणाऱ्या लग्नात काका व चुलत भाऊ येणार, हे गृहीत धरून आरोपीने पूर्ण तयारी केली होती. खून करण्यासाठी त्याने धारधार चाकू पहिलेच ऑनलाईन मागवून ठेवला होता, अशी माहिती पुढे आली आहे. लग्नाचा आनंद सर्व वऱ्हाडी बँडबाज्यात साजरा करीत असतांनाच सुडाने पेटलेल्या आरोपीने डाव साधला. त्यामुळे लग्नाच्या आनंदावर विरजण पडले. सर्वत्र शोक पसरला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. आरोपी मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. आज सर्वत्र याच घटनेची चर्चा सूरू आहे.