वर्धा : राज्यात दुष्काळ जाहीर झाला आणि सरकार सतर्क झाले. शेतकऱ्यांच्या बांधावर, हा उपक्रम ऐन भरात आला. स्थिती जाणून घेण्यासाठी मंत्री, वरिष्ठ अधिकारी, सत्ताधारी आमदार कामाला लागले. वर्धा जिल्ह्यात ८ पैकी ७ तालुके दुष्काळग्रस्त म्हणुन घोषित झाले आणि शासन हडबडले. जिल्ह्याची स्थिती पाहण्यास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दौरा काढण्याची सूचना केली. सूचना आली आणि जिल्हा प्रशासन व कृषी विभाग कामास लागले. पण झाले भलतेच.
नको त्या वाटेने बावनकुळे
देवळीचे आमदार राजेश बकाने यांच्या मतदारसंघात असलेल्या रत्नापूर येथे मंत्री भेट देणार असल्याचे अधिकृत सांगण्यात आले. पण मंत्री तिकडे गेलेच नाही. त्या गावात जाण्याचा मार्ग योग्य नाही. अन्य मार्गे जावू, अशी सूचना सायंकाळी ५ वाजता आली. आणि बावनकुळे चक्क हिरव्यागार शेतात पोहचले. ज्या शेतात गेले ते शेत हिरवे्कंच्च. दाणे कमी पण नुकसान झाले असे चित्र नसणारे.
ही बनवाबनवी का…
कृषी अधीक्षक अरविंद उपरीकर म्हणतात की शेत हिरवेगार असले तरी उत्पन्न अपेक्षित राहील असे नाही. जो भाग खरोखर होरपळलेला आहे तो आतवर आहे, जिथे गाडी जाणे शक्य नव्हते. म्हणुन सोयीचा भाग दाखविला. तर या दौऱ्यात बावनकुळे सोबत असलेले एक ज्येष्ठ भाजप नेते म्हणतात की सगळं काही फसवण्याचा प्रकार आहे. हौस म्हणुन हे दौरे आहेत की काय, असे वाटते. जर मंत्र्यांना खरी स्थिती कळली नाही तर अपेक्षित मदत मिळणार नाही. दुष्काळ समजून घेण्यासाठी की औपचारिक सोपास्कार होत आहे, याची खंत वाटते. तर दौऱ्यात सोबत असलेले एक अधिकारी म्हणाले की वेळेवर शेतकरी व शेत बदलण्यात आले आणि उफराट्या मुरादगाव मार्गे नेण्यात आले हे खरे.
कृषी खात्यानेच दौरा ठरविला – आ. बकाने
या आजच्या बावनकुळे यांचा दौरा झालेल्या भागाचे आमदार राजेश बकाने म्हणाले, कृषी खात्यानेच दौरा ठरविला. मी भाष्य करू शकत नाही. शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट दिली. पिक पाहणी सोबतच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी आ.राजेश बकाने, आ.सुमित वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली व अन्य उपस्थित होते.
अशा झाल्या सूचना
शासनाने दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. वर्धा जिल्ह्यातील सात तालुक्यांचा यात समावेश आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी मदत, नुकसान भरपाई मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, ई-पिक पाहणी महत्वाची आहे. त्यामुळे पिक पाहणी ऑनलाईनसह ऑफलाईन करण्याची सुविधा देखील शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांची पिक पाहणी तातडीने पुर्ण करा, अशा सूचना महसूलमंत्र्यांनी केल्या.
त्यामुळे प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यास याचा फायदा होण्यासाठी पंचनामे अचूक आणि तातडीने पुर्ण करा. पंचनामे संयुक्त आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करा. ग्रामसभेसमोर पंचनामे ठेवा, संबंधित शेतकऱ्यांना दाखवा, नंतर शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना महसूलमंत्र्यांनी केली.
बँक कर्ज वसुलीत दिलासा
दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे शासनाचे धोरण आहे. स्वत: मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे. लवकरच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष मदत दिली जातील. बॅंक कर्ज वसुलीस दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे बॅंकांचे प्रतिनिधी वसुलीसाठी येणार नाही, अशा सूचना बॅंकांना केल्या आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीचे खरे वास्तव समोर यावे, यासाठीच सर्व मंत्री, आमदार प्रत्यक्ष पाहणी दौरे करत आहे. केंद्र शासनाच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाने मदतीचे धोरण स्वीकारले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे खर्चाची काटकसर करून मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन देखील महसूलमंत्र्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
