वर्धा : दिवाळी दिव्यांचा की प्रदूषण उत्सव ? असा प्रश्न पडावा, अशी स्थिती विविध स्वरूपातील होणाऱ्या प्रदूषणामुळे दिसून येते. फटाक्यांचा आवाज, लखलखती रोषणाई, होणारा कचरा यामुळे अशी स्थिती उदभवते. हे टाळायला हवे, असे म्हणतात. पण तसे होत नाही. प्रामुख्याने मुलांचा हट्ट त्यास कारणीभूत म्हटल्या जातो. पण यावर अखेर न्यायालयानेच उपचार सुचविला आहे. त्याची दखल राज्य शासनास घ्यावी लागलीच.
असे आहे परिपत्रक
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ‘सुओ मोटो’ (Suo Motu) जनहित याचिका क्रमांक १/२०२६ मध्ये १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याची शपथ देण्याचा विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.
प्रदूषणमुक्त दिवाळी शपथ
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे, मात्र यादरम्यान मोठ्या प्रमाणावर उडवले जाणारे फटाके पर्यावरण आणि आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. फटाक्यांमुळे होणारे हवा आणि ध्वनी प्रदूषण लहान मुले, वृद्ध व्यक्ती, रुग्ण तसेच मुक प्राण्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरते. याच गंभीर समस्येबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व शाळांना तातडीने निर्देश दिले आहेत. या उपक्रमांतर्गत शाळांच्या परिपाठाच्या वेळेचा उपयोग करून विद्यार्थ्यांना ‘प्रदूषणमुक्त दीपावली’ची शपथ दिली जाणार आहे.
अशी आहे शपथ
या शपथेत विद्यार्थी यावर्षीच्या दिवाळीत फटाके न वाजवण्याचा संकल्प करणार आहेत. तसेच आपले कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही फटाके न वाजवण्यासाठी प्रवृत्तीत करण्याची प्रतिज्ञा यामध्ये समाविष्ट आहे. वर्षभरातील सर्व सण व उत्सव पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त पद्धतीने साजरे करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ यादरम्यान घेतली जाईल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यांच्या पत्राचा संदर्भ देत आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार, शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याविषयीचे पत्र जारी केले आहे.
पर्यावरण विषयी जाणीव
यामध्ये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबईचे शिक्षण निरीक्षक तसेच सर्व महानगरपालिकांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना व प्राचार्यांना या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत त्वरित सूचना देण्यास सांगण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे भावी पिढीमध्ये पर्यावरणाविषयीची जाणीव वाढीस लागेल आणि येणारी दिवाळी अधिक सुरक्षित, निरोगी व प्रदूषणमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
