वर्धा, सोशल मीडियाच्या माध्यमातून असंख्य भोळ्या भाबड्या नागरिकांची फसवणूक झाली. गुन्हेगारीचा हा नवा फंडा अनेकांची कष्टाची तिजोरी रिकामी करून गेला. मात्र यात बराच अटकाव पोलीस खात्याने आणला. आता अर्थकारणात निपुण म्हणुन परिचित शेअर बाजारात गुंतवणूक करीत असतात. मात्र सायबर भामट्यानी यांनाही चूना लावल्याची प्रकरणे उजेडात येत आहे. त्यांच्यासाठी हा खबरदारीचा ईशारा.

शेअर बाजार आणि फसवणूक

शेअर मार्केटमध्ये कमी कालावधीत भरमसाठ नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ‘फेक शेअर ट्रेडिंग फ्रॉड’च्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेतली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर भामटे नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात. ही फसवणूक प्रामुख्याने पुढील टप्प्यांत केली जाते.

अशी ही बनवाबनवी मोहात पाडणाऱ्या जाहिराती

१.सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्सवर “महिन्याला १५ ते २० टक्के परतावा” किंवा “काही दिवसांत मोठा नफा” देणाऱ्या आकर्षक जाहिराती दाखवल्या जातात.
२.विश्वास संपादन करणे: जाहिरातीला प्रतिसाद दिल्यावर हे भामटे तज्ज्ञ असल्याचा बनाव करतात. ते नागरिकांना हुबेहूब खऱ्या वाटणाऱ्या बोगस ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर नोंदणी करायला लावून पैसे गुंतवण्यास भाग पाडतात.
३.दिसणारा खोटा नफा: ॲप किंवा वेबसाईटवर खात्यात मोठा नफा जमा झाल्याचे दाखवले जाते. हे पाहून गुंतवणूकदार अधिक पैसे गुंतवण्याच्या जाळ्यात फसतो.

अशी होते अडवणूक

४.पैसे काढताना अडवणूक: जेव्हा गुंतवणूकदार स्वतःचे पैसे किंवा नफा काढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा भामटे व्हेरिफिकेशन चार्ज, टॅक्स किंवा अपग्रेड फीच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी करतात. पैसे भरल्यानंतर ते संपर्क तोडून पसार होतात.
५.नुकसान आणि फसवणूक: शेवटी आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात येते, परंतु तोपर्यंत त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असते.
बोगस शेअर ट्रेडिंग

अशी प्रमुख लक्षणे

खूप कमी वेळात प्रचंड नफ्याचे आश्वासन देणे.
सेबी (SEBI) किंवा मान्यताप्राप्त संस्थांकडे नोंदणी नसणे.
सतत फोन किंवा मेसेज करून जास्त पैसे गुंतवण्यासाठी दबाव आणणे.
जमा केलेले पैसे काढताना नवनवीन कारणे सांगून अतिरिक्त शुल्काची मागणी करणे.

सायबर पोलिसांचा सुरक्षेचा मंत्र

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरिकांना खालील दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्याही ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवण्यापूर्वी त्याची ‘सेबी’ (SEBI) कडील नोंदणी व कंपनीची पार्श्वभूमी तपासा.
अनोळखी कॉल, मेसेज किंवा सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या सल्ल्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका.
आपला OTP, बँक तपशील किंवा लॉगिन पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका.
गुंतवणूक करताना सावध राहा आणि कोणतीही फसवणूक झाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० (Cyber Helpline 1930) वर संपर्क साधा किंवा mhcyber.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.