वर्धा : केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशात सर्वात कठीण आणि तेवढीच मोठी प्रतिष्ठाप्राप्त परीक्षा समजल्या जाते. देशातील कोट्यावधी तरुणांना ही सेवा खुणावते. लाखो तरुण या परीक्षेसाठी तयारी करतात. महागडी कोचिंग क्लासेस लावतात. दिल्लीत मुक्काम ठोकून तयारी करतात. परीक्षा देतात. पण हजाराच्या आतच यशस्वी होतात. ज्यांची आर्थिक क्षमता असते ते सर्व ती तयारी करतात. पण क्लास लावण्याची ज्यांची क्षमता नसते, त्यांचे काय, या प्रश्नाला पण उत्तर आले आहे.

कारंजा घाडगे या पाण्याचे दुरभिक्ष्य असणाऱ्या तालुक्यातील ठाणेगांव येथील मुलाने ही परीक्षा उत्तीर्ण होत एक नवा आदर्श आजच्या पिढीपुढे ठेवला आहे. तो यावर्षी झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची वार्ता आजच्या निकालातून पुढे आली आहे. देशभरातील युपीएससी गुणवत्ता यादीत तो ६७७ व्या क्रमांकावर झळकला. आता सायंकाळी त्याचा मोबाईल सतत खणखणत आहे. अभिनंदन स्वीकारण्यासाठी.

प्रज्वल नासरे याचे पहिली ते पाचवी हे शिक्षण कारंजा येथील राजीव गांधी इंग्लिश हायस्कुल येथे झाले. पाचवीत असतांना तो नवोदय केंद्रीय विद्यालयाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाला. मग वर्ध्यालगत असलेल्या सेलू काटे येथील नवोदय विद्यालयात त्याने बारावी पर्यंत शिक्षण घेतले. पुढे निवासी राहून शिक्षण घेण्याची सोय नाही म्हणून त्याने दूरस्थ शिक्षण प्रणाली मार्फत मुक्त विद्यापीठातून कला शाखेतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले.

पुढे काय ही शंका नव्हतीच. कारण डॉक्टर होण्याचे स्वप्न भंग झाले आणि प्रज्वलने सनदी अधिकारी होण्याचे ध्येय ठेवले. पण घरी स्थिती बेताची. कोरडवाहू शेतीवर राबणारे वडील व त्यात मोडका तोडका संसार करणारी आई. पण पोराने आयुष्यात नाव कमावले पाहिजे, हे स्वप्न. ही स्थिती असल्याने प्रज्वलने स्वतः ऑनलाईन अभ्यासक्रम तपासला. त्यावर तयारी सूरू केली. दोन वेळा नापास झाला. पण आई म्हणते हिम्मत ठेव, असेल तर चान्स घे. ही बाब बळ देऊन गेली. अखेर तिसऱ्या संधीत तो यशस्वी ठरला आणि वार्ता कळताच आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

या संदर्भात प्रथमच लोकसत्ता ऑनलाईन सोबत प्रज्वल बोलला. तो म्हणतो की इथवर मजल गाठली ती केवळ आईवडील यांनी धीर दिला म्हणून. क्लास लावण्यासाठी पैसे नव्हते म्हणून मी हिम्मत सोडली होती. पण वडील म्हणाले की चिंता नको. तू एकुलता एकच. आम्हास पैश्याचे काय करायचे. लाव ताकद. हे त्यांचे बोल आणि अखेर तिसऱ्या संधीत मी परीक्षा उत्तीर्ण झालो. मला आयएएस कॅटेगरी मिळणार नाही. पसंतीक्रम द्यावा लागतो. म्हणून मी दुसरी पसंती महसूलची दिली आहे. म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मला मिळेल. आकडेमोड मला लहानपणापासून आवडायची. म्हणून या सेवेची निवड केली आहे.

प्रज्वल म्हणतो की मी खूप अवांतर वाचन पण करीत असतो. वृत्तपत्र वाचन उपयोगी ठरतेच. पण काय निवडायचे याचे असंख्य पर्याय असतात. मला इंडियन एक्स्प्रेस हे दैनिक पटले. भाषा सुगम व विषयातील विविधता हे या दैनिकाचे वैशिष्टय. तेच नियमित वाचतो. आता या सेवेत निवड झाली तर काम मन लावून करणार. कर प्रणाली हा आवडता विषय. त्यात सामान्य नागरिकांचा सहभाग विना त्रास असावा, असा माझा हेतू राहील. पण सेवेत गेल्यावरच काय करता येवू शकते हे कळेल. आईवडील यांनी माझ्यासाठी केलेला त्याग लक्षात ठेवून वागणार. समाज भले हेच माझे लक्ष्य.