वर्धा : नात्याला काळिमा फासल्या जात असल्याचे लक्षात येताच क्रोधाचा भडका उडाल्यास नवल नाही. त्यातच मुलीसमान म्हटल्या जाणाऱ्या सुनेवर जर सासराच घृणीत नजर ठेवत असेल तर त्याचा शेवटही वाईटच होणार. अशाच एका घटनेत एकाचा जीव गेलाच.

आष्टी तालुक्यातील नमस्कारी या गावात २७ मे रोजी ही घटना घडली होती. ती आता उजेडात आली आहे. या गावातील ५५ वर्षीय बाबाराव महादेव पारिसे हे २७ मे रोजी रात्री मोबाईल रिचार्ज करायला घराबाहेर पडले होते. तेव्हा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करीत त्यांचा जीव घेतल्याची ओरड झाली. खून केल्यानंतर मृतदेह वर्धा नदीच्या पात्रालगत पायवटेवर आढळून आला होता. गावात अशी हत्या झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी व चौकशी केली. मात्र हे मारेकरी कोण असावे, याचा थांगपत्ता लागत नव्हता. शेवटी या घटनेवर लक्ष ठेवून असलेल्या पोलीस अधीक्षकांनी सायबर सेलसह तळेगाव पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना मारेकऱ्याच्या शोधात लावले.

हेही वाचा – महापालिका निवडणुका टाळल्याने गडकरींच्या मताधिक्यात घसरण

सतत १५ दिवस कसून तपास सुरू होता. हत्या केल्यानंतर आरोपी दुचाकीने पळाले होते, असे पुढे आले. त्या आधारे मृत बाबाराव पारिसे यांचा मुलगा नागोराव बाबाराव पारिसे व त्याचा साळा विलास आनंद केवदे यांना ताब्यात घेतले. मुलगा नागोराव याने साळा आनंदच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. हत्या करुन पळून गेल्यानंतर कुठलाच पुरावा मिळत नव्हता. मात्र दुचाकीच्या डिक्कीवर रक्ताचे डाग आढळून आले होते. पोलिसांनी आरोपीचे रक्तनमुने घेतले. डिक्कीवरील तसेच आरोपीचे रक्त तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल पाझिटिव्ह येताच मुलगा व त्याचा साळा या दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. बाबारावचा आधी गळा आवळण्यात आला नंतर चाकूने वार करण्यात आले. पण तेवढ्यावरच नं थांबता आरोपीनी कुऱ्हाडीने डोक्यावर वार करीत निर्घृण खून केल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – ‘नीट’ परीक्षा : जागा केवळ ७८ हजार, उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येत दोन लाखाने वाढ, राज्यात ८५ टक्के जागांसाठी…

या मागचे कारणही आरोपी मुलाने नमूद केले आहे. बाबाराव पारिसे याची मुलाच्या पत्नीवर तसेच गावातच राहणाऱ्या मुलाच्या साळ्याच्या पत्नीवर पण वाईट नजर होती. त्याबद्दल नेहमी टोकल्या जात असे. बाबाराव व मुलात नेहमी खटके उडत होते. पण त्यावर पडदा पडत नव्हता. शेवटी कट रचल्या गेला. घटनेच्या दिवशीसुद्धा वडील व मुलात भांडण झाले होते. मुलगा नागोराव (३४), याने साळा आनंद (२८) याची मदत घेऊन बापास संपविण्याचा निर्णय रागाच्या भरात घेतला. त्याच दिवशी रात्री ही हत्या करण्यात आली. तब्बल १५ दिवसानंतर हे खळबळजनक हत्याकांड उजेडात आले.