वर्धा : मंदिराचे विश्वस्त हे त्या मंदिराच्या संपत्तीचे राखणदार समजले जातत. ‘तळे राखेल तो पाणी चाखेल’, असे यांच्या बाबत लागू होणार नाही. कारण ही संपत्ती व्यक्तिगत नसून देणगीतून उभी झालेली असते. भक्तगण श्रद्धेपोटी देणगी, दक्षिणा, दागिणे अर्पण करतात. या संपतीची देखरेख तसेच योग्य तो विनियोग करण्याचे काम देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळीकडून अपेक्षित असते. पण तेच जर या संपत्तीवर डोळा ठेवू लागले, तर भक्तांनी करायचे काय ?
हाच प्रश्न येथील सुप्रसिद्ध संत गजानन महाराज देवस्थानात येणाऱ्या भक्तांना पडला. वर्षभरपूर्वी देवस्थानातील गजानन महाराज यांच्या मूर्तीस चांदीचा मुकुट करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला होता. विविध दागिणे स्वरूपात असलेली १ किलो ९०० ग्रॅम चांदी मुकुट घडविण्यासाठी सराफकडे देण्यात आली.
मात्र ती चांदी देवस्थानाचे एक विश्वस्त शालिग्राम टीबडीवाल यांनी काही कारण देत सराफ दुकानातून परस्पर उचलून घेतली होती. मुकुट झाला नाही व त्यास वेळ होत असल्याचे पाहून देवस्थान समितीने ती चांदी शालिग्राम यांना परत मागितली. पण त्यांनी काही कारण देत परत देणे टाळले. अनेकवार मागणी करूनही चांदी परत मिळत नसल्याचे पाहून विश्वस्त मंडळींनी शेवटी पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. हे कळताच शेवटी शालिग्राम यांनी चांदी देवस्थानला परत केली.
यास एक वर्ष झाले. शालिग्राम टीबडीवाल यांची ही कृती संस्थेच्या मूल्यांविरोधात आहे. या कृतीने भक्तांच्या भावना दुखावल्या, असे मत विश्वस्त समितीत व्यक्त झाले. टीबडीवाल यांना विश्वस्त समितीतून काढून टाकण्याचा निर्णय शेवटी घेण्यात आला. मात्र या निर्णयावर आमसभेचे शिक्कामोर्तब आवश्यक होते. आता आमसभा झाली. त्यात डॉ. नारायण निकम यांनी टीबडीवाल यांच्यावर चांदी दागिण्याबाबत ठपका ठेवणारा ठराव मांडला. प्रवीण हिवरे यांनी त्यास दुजोरा दिला. या सभेत देवस्थान समितीचे अध्यक्ष मोहन अग्रवाल तसेच ज्ञानेश्वर पहाडे, कोषाध्यक्ष व्यास, शेखर शेंडे व मधुसूदन अग्रवाल हे उपस्थित होते.
बरखास्त झालेले शालिग्राम टीबडीवाल यांची ओळख वर्धा शहरात एक व्यापारी नेते म्हणून आहे. तसेच राजकीय नेत्यांशी ते सलगी ठेवून असल्याचे वर्धेकर पाहतात. त्यांच्यावर असा चांदी घोळ ठपका ठेवून हकालपट्टी करण्यात आल्याने चांगलीच चर्चा उसळली आहे.
