वर्धा: सोयीचे व स्वस्त इंधन असलेले वाहन म्हणून इलेक्ट्रिक वाहन सध्या प्रचलित झाले आहे. पण हे वाहन चालवीतांना किंवा चार्ज करतांना धोकादायक ठरू शकते, असा इशारा देणारे व्हिडिओ समाज माध्यमावर बघायला मिळतात. पण प्रत्यक्षात असा अनुभव ही वाहने वापरणाऱ्या वर्धेकरांना आला. मृत्यूमुखी पडली एक चुणचुणीत पोर. सदैव प्रथम क्रमांक पटकवणारी. आईची अत्यंत लाडकी. शेवटच्या प्रवासास निघतांना लोटतोय विद्यार्थी सागर.
एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात एका १३ वर्षीय चिमुकलीचा इलेक्ट्रिक वाहनचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. वर्ध्याच्या नालवाडी परिसरातील गजानन अपार्टमेंट मधील ही घटना असून, या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.
वर्ध्याच्या नालवाडी परिसरात राहणाऱ्या तथागत रामटेके यांची १३ वर्षांची मुलगी आरोही रामटेके, हिचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. आरोही ही ‘स्कूल ऑफ ब्रिलियंस ‘ची सातव्या वर्गातील विद्यार्थिनी होती.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारीच्या दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास आरोही आपल्या मैत्रिणीकडे अभ्यासासाठी गेली होती. तिथे बाथरूमला गेली.
त्यावेळी बाथरूमच्या स्विच बोर्ड मध्ये इलेक्ट्रिक गाडी चार्जिंगला लावण्यात आली होती. त्या बोर्डमधून तिला जोरदार करंट लागला. प्राथमिक माहितीनुसार त्या बोर्डला इलेक्ट्रिक गाडीचा प्लग लावलेला होता. ज्यामुळे हा शॉक लागल्याची खात्री झाली आहे. कारण ही इलेक्ट्रिक दुचाकी तिच्या अंगावर पडली होती. शरीर काळे पडले होते.
पण उपचार व्हावे म्हणून तिला साहू हॉस्पिटलमध्ये प्रथम दाखल करण्यात आले. त्यांनी सावंगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. पण वाटेतच तिची प्राणज्योत मावळली. सायंकाळी ६ वाजता ती मृत झाल्याचे सावंगी रुग्णालयाने घोषित केले. एका हसत्या-खेळत्या मुलीचा असा अचानक अंत झाल्याने तिचे कुटुंब, नातेवाईक आणि शाळेतील मित्र-मैत्रिणींना मोठा धक्का बसला आहे.
परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.ती सातव्या वर्गातील विद्यार्थनी होती. विजेच्या उपकरणांचा वापर करताना किती काळजी घेणे गरजेचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या घटनेमुळे रामटेके परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.संस्थाध्यक्ष डॉ. राजेश भोयर हे म्हणतात की आमच्या शिक्षण संस्थेत शिकणाऱया मुलीची घडलेली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.
ती बाहेर एक विज्ञान प्रोजेक्ट करण्यासाठी मैत्रीणकडे गेली होती.पण आम्ही सोबत आहोत. या विदयार्थिनीच्या कुटुंबास मदत अपेक्षित असेल तर मी ती देणार. मी स्वतः विचारणा करून आवश्यक ते सहकार्य देईल. सध्या यावर अधिक बोलता येणार नाही. तर शाळा स्तरीय संचालक सारिका भोयर म्हणतात की आरोही हिचा मृत्यू चटका लावणारा आहे. ती हुशार होती.
सतत पहिल्या नंबरवर असायची. तिचे निधन अतीव दुखदायी. आज शाळेस सुट्टी दिली आहे. आम्ही सर्व शिक्षक तिच्या घरी आहोत. इलेक्ट्रिक दुचाकी हे तिच्या मृत्यूचे कारण ठरले, हे वास्तव. पुढे मुलांनी हे भान ठेवून काळजी घेतली पाहिजे.

