वर्धा: १९३८ पासून कार्यरत असलेल्या व खुद्द महात्मा गांधी यांच्या सूचनेने सूरू झालेल्या विख्यात गोरस भंडार या संस्थेवर अन्न व औषधी प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने छापा टाकण्यात आला. या संस्थेचे बाजारात असलेले दूध, दही, तूप, खवा, गोरस पाक व अन्य जिन्नस परत बोलावले. कामकाज बंद ठेवण्याचा आदेश झाला. आणि एकच वादळ उठले. गोपालक शेतकरी व गांधीवादी संस्था भाजपला चालत नाही कां, असा टिकेचा सूर सूरू झाला. सोशल मीडियावर तर टिकेचे काहूर उठले. हे काय झाले, असा पेच भाजप वर्तुळत चर्चेत आला.
अशी झाली धावपळ आणि…
गोरस भंडार या संस्थेशी जुळलेले शेकडो शेतकरी संस्था बंद पाडण्यात आल्याने सैरभैर झाले. आता आमच्या दुधाचे काय, ते कोण विकत घेणार, चांगला भाव कसा मिळणार, असे प्रश्न घेत ते संतप्त झाले. तडक पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांना घेराव केला. हा प्रश्न गोपालक शेतकरी तसेच भंडारचे दूध घेणारे वर्धेकर नागरिक यांना अडचणीत आणणार, हे ध्यानीमनीच नव्हते. आणि सूरू झाले एक तडजोड मिशन.
पालकमंत्री भोयर यांना घेराव
संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध कुठे न्यायचे हा प्रश्न पडल्याने त्यांनी पालकमंत्री डॉ. भोयर यांना जाब विचारला. त्यांनी पण समस्या लक्षात घेत थेट कारवाई सूत्रधार तुकाराम मुंढे यांना फोन लावत शेतकऱ्यांचे काय, अशी विचारणा केली. या संदर्भात बोलतांना पालकमंत्री म्हणाले की आम्ही शेतकरी वाऱ्यावर सोडणार नाही. मी व मदर डेअरीचे सुधीर दिवे यांनी ही समस्या हाती घेत मार्ग काढला आहे. शेतकऱ्यांच्या दुधाचा एक थेंब पण वाया जाणार नाही, अशी हमी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सदर प्रतिनिधिशी बोलतांना दिली.
सुधीर दिवे म्हणतात की आम्ही…
शेतकरी अडचणीत आल्याचे पाहून भाजपने सोमवारी अरुण लाखानी यांचा अर्ज भरण्याची गडबड असूनही गोरस भंडारचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला. वाटघाटी करणारे भाजप नेते सुधीर दिवे म्हणाले, दूध वाया जावू नये म्हणून मी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या सूचनेने ही बाब हाती घेतली. मदर डेअरीचे सेवाग्राम, दहेगाव येथील संकलन केंद्र व पिंपळखुटा येथील फिलिंग प्लांट येथे १५ गावातील शेतकरी दूध जमा करतील. या डेअरीच्या दिल्ली व्यवस्थानसोबत मी बोललो आहे. स्थानिक पातळीवार जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सूत्रे सांभाळली. त्यामुळे आज दूध स्वीकारण्यात आले.
गोरस भंडारची पुढील व्यवस्था होईपर्यंत दूध मदर डेअरी स्वीकारणार. पुढे काय ते पालकमंत्री डॉ. भोयर नजर ठेवून आहेत.
मुंढे समर्थक अधिकारी म्हणतात..
गोरस भांडार ही शेतकऱ्यांसाठी आधारवड आहे यात शंकाच नाही. परंतु, हजारो शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज तेव्हाच होईल जेव्हा त्या दुधापासून बनणारे पदार्थ १००% सुरक्षित असतील. एफडीए ची कारवाई ही संस्था बंद करण्यासाठी नसते, तर ती सुधारण्यासाठी असते. ‘स्टॉप-वर्क’ नोटीस मिळाल्यानंतर संस्थेला आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून, स्वच्छता मानके (HACCP) अद्ययावत करून पुन्हा तपासणीसाठी अर्ज करण्याचा पूर्ण अधिकार आहे. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या संस्थेचा खरा सन्मान हा कायद्याचे तंतोतंत पालन करून ग्राहकांना सर्वोत्तम आणि शुद्ध दर्जाचे पदार्थ देण्यातच आहे, असे अधिका-यांनी स्पष्ट केले.
