नागपूर : वर्धा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुरुस्कृत केलेल्या Green Corridor म्हणजेच हरित पट्ट्यात लगलेल्या आगीत मोठी हानी झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग १४४ वर हरितक्रांतीचा आदर्श उभा राहावा या उद्देशाने केंद्रीय परिवहन मंत्री Nitin Gadkari यांच्या संकल्पनेतून जाम ते हिंगणघाट दरम्यान “ड्रीम ग्रीन कॉरिडोर” उभारण्यात आला. पर्यावरण संवर्धन, तापमान नियंत्रण आणि प्रवाशांना सुखद अनुभव देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली होती.

आग सत्र

गत आठवड्यापासून या ग्रीन कॉरिडोरमध्ये सतत आगीच्या घटना घडत असून लावलेली वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे आणि आवश्यक प्रतिबंधक उपाययोजनांच्या अभावामुळे हा हरित पट्टा धोक्यात आला आहे. परिणामी जाम–हिंगणघाट हा भाग आगीचा “ब्लॅक स्पॉट” बनत चालला आहे.या घटनांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होते. अन्यथा कोट्यवधींचा हरित प्रकल्प वाया जाण्याची भीती आहे. रविवारी सायंकाळच्या घटनेने परत याकडे लक्ष वेधल्या गेले.

आगीच्या घटना

आष्टी तालुक्यात सुजातपूर जंगल परिसरातील आग लागल्याने मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा जळून खाक झाली. मोर्शी रोड परिसरातील कोण्या अज्ञात व्यक्तीने जंगलात विस्तव पेटविल्याने ही आग भडकल्याची शंका व्यक्त होते. शनिवारी दिवसभर व रविवारी दुपारी पण ही आग धूमसत राहली. आगीची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण पुरेशी व्यवस्था नसल्याने आग आटोक्यात येवू शकली नाही. याच परिसरातील शेतकरी धीरज शेटे यांच्या संत्रा बागेस आगीची झळ पोहचली. या आगीच्या घटनेमागे काही संशय व्यक्त होत असल्याने उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येत आहे. भर जंगलात आग पेटल्याने मोठे किमती वृक्ष भस्मसात झाले असून करोडो रुपयाचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त होते.

सिंदीत आग

समुद्रपूर तालुक्यातील सिंदी परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग भडकली. येथील भीमराव कस्तुरे यांच्या घरातील कडबा या आगीत पेटला.फडणवीस यांच्या शेताला लागून असलेल्या पडीत जागेत विद्युत वितरण कंपनीची डीपी आहे. अचानक त्यात आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्या वाळलेल्या गवतावर पडल्याने आग लागली. त्यातच वारा सुटल्याने आगीने चांगलाच पेट घेतला. त्याचा फटका आजूबाजूच्या घरांना बसला. ही डीपी धोकादायक असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या. मात्र महावितरण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आता आरोप होत आहे. जर वेळेवर दुरुस्ती झाली असती तर ही घटना घडली नसती, असे नागरिक बोलत आहे.