वर्धा : एखाद्या गावातील अट्टल दादा गावावर वचक ठेवून वागतो तेव्हा सामान्य नागरिकांचे जगणे कठीण होऊन बसते. यास आवर घालणार कोण, असा प्रश्न निर्माण होतो. अश्यांसाठी मग खास कायद्याचा आधार घेत बडगा उगारल्या जात असतो. इथेही तसेच झाले. अत्याचार होऊनही ज्याच्याविरोधात पोलिसांकडे धाव कल्पना कोणी करीत नव्हते, त्यास धडा शिकविण्यात आला आहे.
राजू रामू तुमडाम
पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराच्या दहशतीला आळा घालण्यासाठी वर्धा जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी कृत्यांनी उच्छाद मांडणाऱ्या राजू रामू तुमडाम (वय ४० वर्षे, रा. भुगाव, ता. जि. वर्धा) या धोकादायक इसमाला ‘एम.पी.डी.ए.’ (MPDA) कायद्यान्वये पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, आरोपी राजू रामू तुमडाम याच्याविरुद्ध २०२१ पासून सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ करणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, घातक हत्यार बाळगून दहशत पसरवणे, मारहाण करून गंभीर जखमी करणे तसेच दारू पिऊन धिंगाणा घालणे असे एकूण १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पीडित झाले होते त्रस्त
सन २०२१ पासून त्याने या परिसरात जनसामान्यांच्या मनात स्वतःची मोठी दहशत निर्माण केली होती. त्याच्या या सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे अनेक पीडित नागरिक आणि सर्वसामान्य लोक विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. परिणामी, परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून जनजीवन विस्कळीत झाले होते.
या प्रकारची सततची गुन्हेगारी थांबत नसल्याने त्याच्यावर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १२९ (ई) अन्वये एक वर्षासाठी प्रतिबंधक अंतिम बंधपत्रही घेण्यात आले होते. मात्र, या प्रतिबंधक कारवाईलाही न जुमानता त्याने आपले गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवले. त्यामुळे सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांनी या धोकादायक इसमाविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्धतेचा सविस्तर प्रस्ताव तयार केला.
अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल
हा प्रस्ताव वर्धाचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी. यांच्याकडे सादर करण्यात आला.
प्रस्तावाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी राजू तुमडाम याच्या स्थानबद्धतेचे आदेश पारित केले. तदनुसार त्याला पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात आगामी दिवाळी सण शांततेत पार पाडावा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर व अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे संकेत जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी. व पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, २०२५ मध्ये १८ तर २०२६ मध्ये आतापर्यंत १२ अशा एकूण सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.
