वर्धा : गुरुवारी ३० जुलै रोजी हिंगणघाट तालुक्यातील येनोरा या केंद्र शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने आयोजन केले होते. यांस उपस्थित राहण्यासाठी सातेफळ शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना रामटेके या दुचाकीने निघाल्या असतांना त्यांचा वाटेत अपघाती मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली. तर शिक्षक नेत्यांनी नाहक या परिषदेचे आयोजन केले व अशैक्षणिक कामे लादल्या जात असल्याचा आरोप लोकसत्ताशी बोलतांना केला. यावर हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे SIR प्रशिक्षण किंवा मतदारयादीचे काम नसल्याचा खुलासा लोकसत्तास दिला.
तत्पर दखल आणि अहवाल
या घटनेने संताप व्यक्त होत असल्याचे चित्र दिसून आले. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. आज सकाळी सर्व ती माहिती घेत अहवाल सादर झाला. लोकसत्तास प्राप्त या अहवालातून काही बाबी स्पष्ट होतात.
शिक्षण परिषद अनिवार्य नव्हती
या अहवालतून केंद्रप्रमुख स्पष्ट करतात की केंद्रातील सर्व शाळांना पूर्वसूचना देण्यात आली होती. २८ पैकी २५ शिक्षक हजर झाले. ज्योत्स्ना रामटेके हजर नव्हत्या. परिषद सूरू असतांनाच तिथे उपस्थित जयश्री हरणे यांना पोलिसांचा फोन आला. श्रीमती रामटेके यांच्या अपघाताची माहिती आली. परिषद स्थगित करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. पावसाळी प्रतिकूल वातावरण लक्षात घेत कोणासही या परिषदेस उपस्थित राहण्याची व्यक्तिगत किंवा सामूहिक सक्ती करण्यात आली नव्हती, असे केंद्रप्रमुख सांगतात. तसेच सक्ती करणारे फोन, संदेश, निर्देश नव्हते.
संबंधित मुख्याध्यापक ज्योत्स्ना रामटेके या दिवशी सकाळी १० वाजता शाळेतून निघाल्या. घरी जेवायला जाणार असून त्यानंतर या परिषदेत पोहचणार असल्याचे त्यांनी सहकारी शिक्षिकेस सांगितले होते. मात्र नंतर त्यांचा अपघात झाल्याचीच दुर्दैवी घटना घडली. केंद्रप्रमुख यांनी असेही स्पष्ट केले की रामटेके यांची SIR किंवा कोणत्याही निवडणूक विषयक कोणत्याही कामासाठी नियुक्ती करण्यात आली नव्हती.
प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणतात…
केंद्रप्रमुख यांनी दिलेल्या अहवालवर टिपणी करतांना प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणतात की माहिती व नोंदीआधारे स्पष्ट होते की सदर घटना शिक्षण परिषद सूरू असतांना घडली आहे. अपघाताच्या कारणाबाबत, वेळ, स्थळ, परिस्थिती अथवा कोणत्याही व्यक्तीची जबाबदारी याबाबत अंतिम निष्कर्ष काढणे हे संबंधित पोलीस यंत्रणा व इतर सक्षम प्राधिकरणाच्या चौकशीच्या अधीन आहे. त्यामुळे या अहवालातील बाबी केवळ उपलब्ध कागदपत्रे, केंद्रप्रमुख यांच्या अहवालतील माहिती व कार्यालयीन नोंदीच्या आधारे नमूद करण्यात आल्या. या अहवालतील कोणतीही बाब ही अपघाताचे कारण किंवा कोणाचेही उत्तरदायित्व निश्चित करणारी समजू नये. असे स्पष्ट करण्यात आले आहे. अपघाती मृत्यूबाबत काही बाबी चर्चेत आल्यानंतर या घटनेची चौकशी करणार काय, असा प्रश्न लोकसत्ताने उपस्थित केला होता.
