वर्धा : गत २० दिवसापासून वर्धा जिल्हा पावसाची चातकासारखी वाट बघत होता. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे तर नागरिक गर्मीने हैराण. आणि पाऊस आला तर ग्रामीण जनजीवन विस्कळीत करून गेला आहे. रस्त्यांची तर पार वाट लागली आहे. गाडी चालवायची कशी अशी चिंता ग्रामीण भागात दिसून येत आहे. परत अलर्ट आला आहे.
हे रस्ते पडले ठप्प
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते पूर आल्याने बंद पडले आहे. म्हणजे वाहतूक सुरळीत नाही. गंगापूर नाल्यास पूर आल्याने आंजी ते अंदोरी रस्ता, सरूळ येथे पूर असल्याने वर्धा – राळेगाव, आलोडा – बोरगाव, भोजनखेडा – तळेगाव, देवळी – पुलगाव, वायगाव – हुस्नपूर, रायपूर – अंदोरी, आलमडोह – अल्लीपूर, वायगाव – राळेगाव, पुलगाव ते बोदड हे रस्ते वाहतुकीस बंद झाले आहे. रोठा येथे कॅनल फुटल्याने पूल पाण्याखाली गेला आहे. रायपूर ते अंदोरी रस्ता पूर्णतः उखडला आहे. यशोदा नदीवरील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
अशी आहे पर्जन्यनोंद
जिल्हयातील एकूण ५५ महसूल मंडळांपैकी तब्बल ४३ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात वर्ध्यात सरासरीच्या १०९.६% (२९९.८ मिमी) पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार वर्धा (११९.२ मिमी), देवळी (११९.२ मिमी), सेलू (१०९.९ मिमी), समुद्रपूर (१०३ मिमी), आर्वी (८४.८ मिमी), हिंगणघाट (७६.१ मिमी) आणि कारंजा (४६.४ मिमी) पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील मुख्य नद्या असलेल्या धाम, वणा आणि वर्धा नदीतील पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी सध्या या नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली असून निम्न वर्धा प्रकल्पात ७४.५८%, बोर प्रकल्पात ६६.६२%, तर पोथरा प्रकल्पात ६१.१०% उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.
अतिवृष्टीमुळे विविध तालुक्यांत २८६ घरांचे व १० गोठ्यांचे अंशतः किंवा पूर्णतः नुकसान झाले असून २७ घरांमध्ये पाणी शिरले आहे. सर्वाधिक १५१ घरांचे नुकसान सेलू तालुक्यात झाले आहे. देवळी तालुक्यात ५ जणांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे, तर वर्धा व सेलू तालुक्यात प्रत्येकी एका जनावराचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज ३१ जुलै रोजी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, पुढील तीन दिवस (१ ते ३ ऑगस्ट) वातावरणात सुधारणा होऊन ‘ग्रीन अलर्ट’ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
