वर्धा : उष्णतामानात देशात दुसऱ्या क्रमांकावर वर्धा जिल्हा असल्याची नोंद झाली आहे. गत एप्रिल महिन्यापासून उष्मा सातत्याने वाढत आहे. आता पारा कळस गाठत असल्याची आकडेवारी आहे. वर्धा जिल्ह्यात उन्हाचा पारा ४६°C पर्यंत पोहोचला असून देशातील सर्वात उष्ण जिल्हा म्हणून नोंद झाली आहे.वर्धा व अकोला ४६ अंशावर असून उत्तरप्रदेशातील बांदा हा जिल्हा ४६. ४ अंश तापमान राखत पहिल्या क्रमांकावर आहे. वर्धा यावर्षी सातत्याने पारा उंचावण्यात पुढे आला आहे.

जुनी विक्रमी नोंद

अधिकृत हवामान नोंदींनुसार १९९६ मधील एप्रिल महिन्याचा विक्रम आणि मे महिन्यातील सर्वकालीन उच्चांक यांचे अचूक आकडे खालीलप्रमाणे आहेत. १९९६ चा विक्रम ३० एप्रिल १९९६ रोजी वर्ध्याचे तापमान ४६.४ (४६.४ अंश सेल्सिअस) नोंदवले गेले होते. हा ३० वर्षांपूर्वीचा एप्रिल महिन्यातील सर्वोच्च रेकॉर्ड होता.

मे महिन्यातील सर्वकालीन उच्चांक (All-time High) वर्धा जिल्ह्याच्या संपूर्ण इतिहासात मे महिन्यात सर्वोच्च तापमान ४८.४ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेले आहे. आता तो विक्रम मोडीत निघून तापमानचा नवा विक्रम स्थापित होतो की काय, अशी भिती पर्यावरण अभ्यासक व्यक्त करीत आहे. त्याचा पहिला दृष्य परिणाम म्हणजे भुगार्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली येत आहे. पाणी टंचाई बैठका याच मुद्द्याने गाजू लागल्या आहेत.

सल्ले आणि सूचना

  • या विक्रमी तापमानाने विविध सूचना पुढे येवू लागल्या असून खबरदारी घेण्यास सांगणारे सल्लागार वाढल्याचे गमतीदार चित्र आहे. पण काही गंभीर पण आहेत.दुपारी १२ ते ४ घराबाहेर पडू नका.भरपूर पाणी प्या. दिवसाला ३-४ लिटर.
  • हलके सुती कपडे वापरा. टोपी/छत्री घ्या.
  • लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्या.
  • ORS, लिंबू पाणी, ताक प्या. डिहायड्रेशन टाळा.
  • चक्कर येणे, मळमळ, जास्त घाम येणे, अंग गरम होणे. लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अविनाश टाके यांनी दिली.

सलग वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून भरपूर पाणी, सरबत घ्यावे. मजूर, शेतकरी व बाहेर काम करणाऱ्यांनी डोक्यावर ओले फडके, टोपी वापरावी. उन्हाची तीव्रता पाहता एकमेकांची काळजी घ्या. गरजूंना पाणी द्या, सावलीत थांबवा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.