वर्धा : प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर बाई येथे घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह गावाजवळील विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर गुन्हा लपवण्यासाठी पत्नीने स्वतः पोलिसांत पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र वडनेर पोलिसांनी कौशल्याने तपास करत या संपूर्ण हत्याकांडाचा पर्दाफाश केला असून पत्नीसह चौघांना ताब्यात घेतले आहे.

मृत पती व पत्नी

संतोष पांडुरंग केकाळे (वय ४२, रा. शेकापूर बाई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संतोष यांची पत्नी सपना केकाळे (३६), तिचा प्रियकर व संतोष यांचा चुलत भाऊ शुभम रमेशराव केकाळे (३०), सचिन प्रभाकर असूणे (३०) आणि प्रशांत रमेश कप्ये (३६) या चौघांना अटक केली आहे. मध्यरात्री घरात घडली ही थरारक घटना.

पोलीस तपासातून मिळालेल्या माहितीनुसार १६ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास संतोष यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. सपना हिने प्रियकर शुभम केकाळे आणि त्याचे दोन साथीदार सचिन प्रभाकर बसूणे ( रा. मांढली ) व प्रशांत रमेश करपे ( रा.मांढली, जि. चंद्रपूर ) यांच्या मदतीने संतोष यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो गावाजवळील बोबडे यांच्या विहिरीत फेकून दिला. या प्रकरणात चुलत भावानेच विश्वासघात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रियकर शुभम हा मृत संतोष यांचा चुलत भाऊ आहे. रक्ताच्या नात्याला काळीमा फासत सपना व शुभम यांच्यातील अनैतिक संबंधांत संतोष अडथळा ठरत असल्याने त्यांचा काटा काढण्याचे षडयंत्र रचण्यात आले.

अशी उघडकीस आली घटना

हत्या केल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी पत्नी सपना हिने वडनेर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मात्र पोलिसांना तिच्या जबाबावर संशय आल्याने तपासाची दिशा बदलली. संशयितांची सखोल चौकशी केली असता अनैतिक संबंधाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आणि हत्येचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला. देवानंद पांडुरंगजी केकाळे (वय ५०) यांच्या फिर्यादीवरून वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार नायक, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी गोविंद गवारी, पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व पथकाने केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.