वर्धा : ग्रामपंचायत कारभार म्हटलं की वाद आलेच. गावात दोन गट असतातच. त्यातून चालणारे बेरकी राजकारण. आणि प्रसंगी होणारे तंटे नवे नाहीत. आता हेच बघा. ग्रामसभेची काय ताकद असते, ते यनिमित्याने दिसून आले. हिंगणघाट तालुक्यातील हळदगाव – शिवणी या गावची सभा चांगलीच गाजली. त्यात सरपंच व अन्य घायकुतीस आल्याचे चित्र पुढे आले आहे.

ग्रामसभा की गोंधळ

वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव, शिवणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवरून गोंधळ उडाल्याचे चित्र सामोर आले आहे.२७ आँगस्ट २०२६ ला ग्रामपंचायती मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा हिशोब आणि विविध विकासकामांबाबत प्रश्न विचारले असता एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर प्रशासक किंवा ग्रामसेवक देऊ शकले नाही. गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले जाते. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या हळदगाव ,शिवणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळाले, असे होमराज रवांदले हे गावकरी म्हणतात.

विकास कामे ठप्प

ग्रामपंचायतीला शासनाकडून लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला. पण अपेक्षित विकास कामे झाली नाहीत .गावातील मुख्य रस्ताचे काम २ ते ३ वर्षा पासून अपूर्ण आहे. नाल्याची गेल्या ८ ते १० महिन्यां पासून साफसफाई झालेली नाही,गावात बस थांब्यावर साधं शेड सुद्धा नाही, स्मशान भूमीत जाण्यासाठी रस्ता नाही,लाईन तासनतास बंद असते ,जि. प. शाळेचे हाल बेहाल आहे, पिण्याच्या पाण्याचे अनेक प्रश्न आहेत. या सर्व समस्या कधी सोडवणारं अशा प्रश्नं करत ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकाला धारेवर धरले .

प्रश्नांचा भडिमार सुरू

गावकरी विविध मुद्दे उपस्थित करू लागले. ग्रामस्थांच्या प्रश्नांना टाळाटाळ करीत सरपंचांनी ग्रामसभेतून काढता पाय घेतला.
गावाच्या विकासाशी संबंधित प्रश्न मांडायचे कुठे आणि त्याचे उत्तर देणार कोण? हातपंप ओटा हा वादाचा मुद्दा झाला. इतके पैसे लागलेच कसे, शिवणीत कामेच होत नाही, घरकुल वाटप अनियमित असे व अन्य आरोप करण्यात आले. ग्रामसभेत ग्रामस्थांनी गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केल्याचे उपस्थित गावकरी सांगतात.

सरपंच म्हणतात की…

या आरोप – प्रत्यारोप व अन्य वादावर बोलतांना सरपंच जगदीश वरटकर हे म्हणतात की पळ काढला असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. मला अन्य कामासाठी बाहेर जायचे असल्याने सभा चालू ठेवण्याची सूचना करीत मी निघालो. काही वेळाने परत सभेत बसलो. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ज्या कामावर आक्षेप आहेत, त्याची चौकशी करण्यास मीच पुढाकार घेतो. जसा निधी उपलब्ध होतो, तशी कामे होतात. कामाचे इस्टीमेट मी नव्हे तर अभियंता ठरवितो. तसेच झाले आहे. नाहक आरोप करणे योग्य नव्हे. हळदगाव व शिवणी या दोन्ही गावाचा समान विकास करण्याचे उद्दिष्ट आहे.