वर्धा : भटक्या कुत्र्यांची बाब थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचली होती. न्यायालयाने पण त्याची दखल घेत संबंधित यंत्रणेस काही निर्देश दिले होते. त्यात शिक्षकांना या अनुषंगाने जबाबदारी देण्यात आली आणि एकच ओरड झाली. मात्र एका शहरात या भटक्या मुक्या जीवाबाबत कणव दिसून आली आहे. त्यांची सोय कशी लावावी, याचा तोडगा पण सांगण्यात आला आहे.

निसर्गसाथी संस्था म्हणते

हिंगणघाट शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आणि ‘निसर्गसाथी ऐतिहासिक ग्रुप’ने शहरात पाळल्या जाणाऱ्या विदेशी जातीच्या कुत्र्यांवर नगर परिषदेमार्फत वार्षिक कर (Pet Tax) आकारण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली आहे. या पत्रकामुळे आता शहरात पाळीव प्राण्यांच्या नियमावलीबाबत नवीन चर्चा सुरू झाली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, हिंगणघाट शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नगरपालिकेकडून नसबंदी मोहीम राबवली जात आहे. मात्र, दुसरीकडे अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर विदेशी जातींचे कुत्रे प्रजनन केंद्रातून (Breeding Centres) आणून पाळत आहेत. काही कुटुंबांमध्ये तर चक्क ५ ते ६ विदेशी कुत्रे पाळले जात असल्याचे दिसून आले आहे.

विदेशी कुत्र्यांची वाढती क्रेझ

विदेशी कुत्र्यांच्या वाढत्या क्रेझमुळे भारतीय देशी कुत्र्यांना दत्तक घेण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. म्हणूनच, विदेशी जातीचे कुत्रे बाळगणाऱ्या नागरिकांवर वार्षिक कर लावावा आणि या करातून जमा होणारा निधी मोकाट व देशी कुत्र्यांचे संगोपन, लसीकरण (Vaccination) आणि त्यांच्या निवारा व्यवस्थेसाठी (Shelter Homes) वापरण्यात यावा, अशी मागणी

हे आहेत आक्रमक विदेशी श्वान

पर्यावरणप्रेमींनी केली आहे. आक्रमक कुत्र्यांवर नियंत्रणाची आणि नियमांची गरज आहे.

पर्यावरणप्रेमींनी निवेदनात नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही अत्यंत गांभीर्याने मांडला आहे. शहरात काही नागरिकांकडे ‘पिटबुल’ (Pitbull) आणि ‘रॉटविलर’ (Rottweiler) सारख्या अत्यंत आक्रमक आणि धोकादायक जातींचे कुत्रे पाळले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या हिंस्र व आक्रमक जातींच्या कुत्र्यांबाबत नगर परिषदेने तात्काळ योग्य नियम व नियंत्रण उपाययोजना कराव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

भारतीय कुत्रे सर्वच बाबतीत सरस

निवेदनात पुढे म्हटले आहे की, विदेशी कुत्रे सर्वत्र घाण करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्याउलट, भारतीय जातीचे कुत्रे हे हवामानाशी अनुकूल, आरोग्यादायी प्रजाती म्हणून आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी जास्त उपयुक्त व सर्वच बाबतीत सरस आहेत. नगरपालिकेचा मुख्य उद्देश मोकाट व देशी कुत्र्यांना संरक्षण देणे हा असायला हवा.

कर आकारा आणि

तसेच, नगरपालिकेद्वारे राबवल्या जाणाऱ्या नसबंदी मोहिमेबाबत नागरिकांमध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी विदेशी कुत्र्यांवर कर आकारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. या निवेदनावर ‘निसर्गसाथी ऐतिहासिक ग्रुप, हिंगणघाट’ आणि स्थानिक पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता यावर हिंगणघाट नगर परिषद काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्ष व पालिका मुख्याधिकारी यांना याबाबत निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे.