वर्धा: साळिंदर, साळू किंवा सायाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राण्याची ही धडपड. हा अंगावर लांब, तीक्ष्ण काटे असलेला निशाचर म्हणजे रात्रीवेळी सक्रिय असलेला जीव. हे प्रामुख्याने टेकड्या, झुडुप किंवा गवती बिळात राहतात. स्व संरक्षण करण्यासाठी ते आपले काटे उभे करतात. शत्रूवर उलट दिशेने धाव घेत काटे टोचतात. ही बाब खूप वेदणादायी असते. हे काटे म्हणजे एकप्रकारचे केसच असतात. अंगावरील हे काटे तो फेकून मारतो, असा मोठा गैरसमज साळिंदर बाबत पसरला आहे. हा प्राणी दिवसभर बिळात असतो आणि रात्रीवेळी अन्न शोधण्यासाठी बिळाबाहेर पडतो. ते अन्न साखळीचा महत्वाचा भाग असून आता त्याच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.
एक पिटुकला साळिंदर
हा एक लहान साळिंदर हिंगणघाट येथील सतेफळ रोड परिसरातील सुरेश बोकडे यांच्या घरात आढळून आला. कंपाऊंड मध्ये रात्री ११ वाजता दिसला. आजूबाजूस कुत्री असल्याने त्यांच्या भीतीने तो भिंतीच्या फटीत अडकून बसला होता. निवासी बोकडे कुटुंब काटे फेकून मारत असल्याचे ऐकून होते. ते घाबरले. त्यांनी मग पक्षीमित्र प्रवीण कडू यांना फोन करीत माहिती दिली.
असा केला बचाव
माहिती मिळताच कडू हे त्यांचे सहकारी प्रशांत भोयर यांच्या सोबत घटनास्थळी पोहचले. अंधारात अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत ते दिसून आले. या साळिंदरला पकडायचे कसे हा पेच. सुरक्षित पकडण्यासाठी काही वेळा सावध प्रयत्न केले. अखेर काही प्रयत्न झाल्यानंतर साळिंदर एका प्लास्टिक बादलीत अडकली. ती सुरक्षित राहावी म्हणून रस्त्यालागत झुडूपी परिसरात सोडून देण्यात असले. जीव वाचविण्यात यश आल्याबद्दल कडू यांनी समाधान व्यक्त केले.
साळिंदर प्राणी सुरक्षित सूचित
हा लाजरा साळिंदर प्राणी आता दुर्मिळ होत चालल्याचे म्हटले जाते. वन्यजीव संरक्षण कायद्याने त्या प्राण्यास संरक्षण देण्यात आले आहे. प्रवीण कडू सांगतात की साळिंदर हा शाकाहारी प्राणी आहे. तो बिळात राहतो. गवत, पाने, फुले व कंद हा त्याचा आहार आहे. तो काटे फेकून मारतो हा गैरसमज असून प्रत्यक्षात ते केरोटीन पासून बनलेले केस असतात. हिंगणघाट परिसरातील बंद पडलेल्या गिरण्यात त्याचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. येथील नाल्यात असलेले बिळे हे त्याच्या सुरक्षेस उपयुक्त ठरत आले आहे.
