वर्धा : मातृत्व म्हणजे स्त्री जन्माचे सार्थक, अशी पारंपरिक भावना आजही समाजमान्य आहे. विशेष म्हणजे, विवाहित स्त्री पण यावर अढळ श्रद्धा ठेवत असल्याचे चित्र नवे नाही. मात्र गर्भधारणेच्या आनंदापासून वंचित राहण्याची आपत्ती पण काहींवर ओढवते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यावर वैद्यकीय विज्ञानाने टेस्ट ट्यूब बेबीचे उत्तर शोधले आहे. त्याचे केंद्र मेघे अभिमत विद्यापीठाच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात स्थापन झाले असून गत आठ वर्षात ईथे ३४० टेस्ट ट्यूब बाळांचा जन्म झाला आहे.

हेही वाचा…‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्‍या पर्वात अमरावतीकर आर्या जाधवची दमदार एन्ट्री

याच अश्या गर्भवती मातांसाठी मेघे व्यवस्थापन फॅशन शो उपक्रमाचे आयोजन करीत असते. जागतिक भ्रूणविज्ञान दिनानिमित्त गर्भवती मातांसाठी आयोजित अभिनव फॅशन शोमध्ये विमान वाहतूक सेवेत हवाईसुंदरी राहिलेली श्वेता डवरे ‘मिसेस मदर अँजल’ विजेतेपदाची मानकरी ठरली.

तर, सोनाली सागर रामधन आणि दुर्गा आशिष मिश्रा या उपविजेत्या ठरल्या. या स्पर्धेत तब्बल २३ गर्भवती माता सहभागी झाल्या होत्या.  सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत गर्भवती मातांनी रॅम्प वॉक करीत लक्ष वेधून घेतले. तर, दुसऱ्या फेरीत स्त्रीत्व आणि मातृत्व यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना समयसूचक उत्तरे देत उपस्थितांना जिंकले.

स्पर्धेतील विजेत्यांना उपजिल्हाधिकारी प्रियांका राहुल कर्डिले, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे व मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव यांच्या हस्ते विजेतेपदाचा मुकुट, रोख पुरस्कार, बेबी किट्स, शाल, उपयुक्त भेटवस्तू आणि वृक्षरोप देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय, सर्वच गर्भवती मातांना अतिथींच्या हस्ते रोख पुरस्कार, बेबी किट्स, भेटवस्तू व वृक्षरोप देऊन गौरविण्यात आले. आईपणाच्या मनमोहक छटा टिपण्यासाठी छायाचित्रणाची आकर्षक सुविधाही नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली होती. गर्भारपण आणि मातृत्व याबाबत असलेले परंपरागत गैरसमज दूर सारून आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा…नागपूर : धक्कादायक! प्रेम त्रिकोणातून पहिल्या प्रियकराचा खून

पुरस्कार वितरण सोहळ्याला डॉ. अलका रावेकर, कार्यकारी संचालक डॉ. तृप्ती वाघमारे, डॉ. मीना ज्योतवानी, अधिपरिचारिका माधुरी ढोरे, कार्यक्रमाच्या संयोजक तथा टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रमुख डॉ. दीप्ती श्रीवास्तव, परीक्षक डॉ. शिवाली काशीकर, डॉ. स्वरूपा चकोले, डॉ. मंजूषा अग्रवाल, डॉ. संज्योत निनावे, डॉ. मेघा, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात भ्रूणविज्ञान विशेषज्ञ डॉ. आकाश मोरे, डॉ. जरुल श्रीवास्तव, नम्रता अंजनकर व दीपाली मोरे यांचाही सत्कार करण्यात आला. 

हेही वाचा…नागपूर जिल्ह्यात रस्ते अपघात बळींची संख्या धक्कादायक, गडकरींनी दिला इशारा…

सध्या भ्रूणविज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रमही मेघे अभिमत विद्यापीठात कार्यान्वित असल्याचे प्रास्ताविकात डॉ. दीप्ती श्रीवास्तव यांनी सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन डॉ. सोनाली चौहान, डॉ. अपूर्वा दवे व डॉ. आकृती शिंदे यांनी केले. प्रारंभी समीक्षा हटवार हिने गणेश वंदना आणि यशोदा व कृष्णाचे गीत सादर करून वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. धर्मेश पटेल, डॉ. साक्षी चांडक, मानस, लासी बिस्वास, खुशबु कुंडू, रंजना दिवेकर, सुरेंद्र यादव, डॉ. शीतल कांबळे, मिलिंद यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला कृत्रिम गर्भधारणा उपचारांचा लाभ घेतलेली सुमारे ७५ दांपत्ये आपल्या बाळाला घेऊन या कार्यक्रमात सहभागी झाल्याने टेस्ट ट्यूब बेबींचा मेळावा असल्याचे दृश्य सभागृहात निर्माण झाले होते.   

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha hospital celebrates world embryology day with fashion show for expectant mothers pmd 64 psg
Show comments