वर्धा: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ५ विश्वासू स्वीय सचिवांना आमदार म्हणुन निवडून आणले, ही बाब एव्हाना महाराष्ट्रास सुरिचित झालेली. आता हे आमदार आपल्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे खास म्हणुन विशेष आब राखून आहेत. त्यापैकी एक प्रसिद्धी पावलेले नाव म्हणजे आर्वीचे आमदार सुमित वानखेडे. त्यांनाच एक प्रशासकीय झटका बसला. जिल्ह्यातील ८ पैकी ७ तालुके दुष्काळी यादीत आले. एकच कारंजा सुटला. वर्धा जिल्ह्यात खरे तर कारंजा घाडगे तालूका पाण्याचे दुर्भीक्ष्य असलेला तालुका म्हणुन ओळखल्या जातो. टँकर प्रथम याच भागात लागतात. पण दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून तोच वागळल्या गेला आणि एकच चर्चा सूरू झाली.
यादीत कारंजा नाही कारण
राज्यातील दुष्काळग्रस्त तालुका ट्रिगर १ ( ७५ टक्क्यापेक्षा कमी पाऊस ) यादीत आला नाही. त्यामागचे कारण असे दिल्या जाते की या तालुक्याचे सरासरी पर्जन्य ६६७ मिमी आहे. त्यापैकी ५४६ मिमी पाऊस या ठिकाणी झाला. सरासरीच्या ८१ टक्के पावसाची नोंद यावर्षी झाली. त्यामुळे दुष्काळी यादीत कारंजा आला नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत पडले. पण दिलासा होताच. कारण आमदार वानखेडे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट.
ही बाब आमदार वानखेडे यांनी अमरावती दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस ( CM Fadanvis ) यांना भेटून विषद केली. कारंजा तालुक्याचे सरासरी पर्जन्य हे जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे ट्रिगर १ लागू करतांना सरासरी पर्जन्य हा निकष लावण्यात आला. म्हणुन दुष्काळ लागू झाला नाही. या तालुक्यात पण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांना समजावून सांगण्यात आली.
उमटला विशेष शेरा
त्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागणी पत्रावर त्वरित टिपणी केली. मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवांना निर्देश देण्यात आले. कारंजा तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे ग्राउंड ट्रुथिंग ( प्रत्यक्ष स्थिती ) आधारावर ट्रिगर १ ऍक्टिव्हेट करीत कारंजा तालुक्याचा यादीत समावेश करावा, अशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिफारस केली. आमदार सुमित वानखेडे म्हणतात की यादीत कारंजा तालुका समाविष्ट करण्याचा आदेश सोमवारी निघू शकतो. ‘ देवाभाऊ असतांना काय चिंता ‘ असे ते नमूद करतात.
